कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे बँकेत येणारे ग्राहक,शेतकरी, महिला,वृद्ध नागरिक यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेची कर्जत शहरांमध्ये एकमेव शाखा आहे.यामुळे येथे तालुक्यांमधून नागरिक येत असतात परंतु मागील काही महिन्यांपासून या बँकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा सतत वनवा आहे.
यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज किंवा इतर नागरिकांना होम लोन,विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन,बचत गटांना असणारे लोन यासह इतर सर्व कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर होऊन देखील त्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत.अधिकारी किंवा कर्मचारी सतत गैरहजर राहतात त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एकेकाळी ट्रेझरी बँक म्हणून कर्जत मध्ये ओळखली जाणारी बँक आज या बँकेचे आर्थिक उलाढाल इतर बँकांच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरल्याचे दिसून येते.अनेक ग्राहक पर्याय नसेल तेव्हा या बँकेकडे येत आहेत. यामुळे वरिष्ठांनी या बँकेच्या शाखेकडे लक्ष न दिल्यास या बँकेच्या आर्थिक उलाढाल आणखीन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामुळे या ठिकाणी मराठी भाषिक अधिकारी देऊन येथील स्टाफ वाढवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कमी कर्मचारी संख्या असल्यामुळे बँकेत सध्या कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील शारीरिक व मानसिक त्रास होत आहे.