हमाल पंचायतीच्यावतीने पोलिस उपनिरिक्षक अजिनाथ घुले याचा सत्कार
कष्टकर्यांचा मुलगा पोलिस उपनिरिक्षक झाल्याचा हमाल पंचायतला अभिमान- अविनाश घुले
नगर – हमाल-मापाडी हे आपल्या वाट्याला जे आले ते मुलांना येऊ नये यासाठी कष्ट करुन आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवत आहेत. आज अनेक कष्टकर्यांची मुले-मुली उच्च शिक्षित होऊन उच्च पदापर्यंत गेल्या आहेत. गुणवंत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही हमाल पंचायत घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सहाय्य करत असते. आज कृषी उत्पन्न समितीमधील कष्टकरी कामगार भिवसेन घुले यांचा मुलगा आजिनाथ हा पोलिस उपनिरिक्षक परिक्षा उत्तीर्ण झाला, याचा हमाल पंचायत व सर्वच कष्टकर्यांना मोठा अभिमान आहे. त्यांचे हे यश इतर मुलांसाठी प्रेरणादायी राहील. कष्टकर्यांच्या मुलांनी उच्च शिक्षित होऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चिज करावे, असे आवाहन हमाल पंचायतचे जिल्हा अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने पोलिस उपनिरिक्षकपदी अजिनाथ भिवसेन घुले यांची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, बहिरु कोतकर, सतिश शेळके, भिवसेन घुले, रविंद्र भोसले, चंद्रकांत हंबर्डे, संजय शिरसाठ, गोटू फुंदे, मच्छिंद्र गिरी, नामदेव बटुळे, तबाजी कार्ले, बाबा गिते, युवराज राऊत, अजुृन शिंदे, सोनू खोमणे, आसिफ कादरी, कचरु शिरसाठ, डॉ.विजय कवळे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना अजिनाथ घुले म्हणाला, कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची गरज असते. आज प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष निश्चित केले पाहिजे. ही परिक्षा सोपी नव्हती, परंतु आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण जिद्दीने हे यश मिळविले. यासाठी हमाल पंचायतीचेही सहकार्य व प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन गोविंद सांगळे यांनी केले तर आभार मधुकर केकाण यांनी मानले. यावेळी हमाल-मापाडी, कष्टकरी उपस्थित होते. अनेकांनी पीएसआय अजिनाथ घुले याचे अभिनंदन केले.
- Advertisement -