जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने चि.अक्षय सांगळे व कु.श्रुती चोरमले यांचा सत्कार
कष्टकार्यांच्या मुलांच्या मेहनतीने उच्च पदावर काम करण्याची संधी – अविनाश घुले
नगर – आज सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी कठोर परिश्रम, मेहनतीची गरज आहे. तेव्हाच तो टिकू शकतो. आज हमाल पंचायत, माथाडी कामगार, कष्टकरी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनविले आहे. कष्टकर्यांची मुले आज उच्च शिक्षण घेऊन सरकारी व मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये उच्चस्थ पदावर विराजमान झाले आहेत. या मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे खर्या अर्थाने सोने केलेच म्हणावे लागेल. आज चि.अक्षय व कु.श्रुती यांनी आपल्या मेहनतीने शिक्षण घेऊन चांगल्या पदावर सेवा करण्याची संधी मिळविली आहे. हमाल पंचायतच्या माध्यमातून कष्टकर्यांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदतीचा हात दिला जातो. ही मुलेही यश मिळवत आहेत, या मुलांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने माथाडी कामगार रावसाहेब सांगळे यांचे चि.अक्षय सांगळे यांची मुंबई महानगरपालिकेत नियुक्ती तसेच कु.श्रुती राजू चोरमले हीची मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कंपनीत नियुक्ती झाल्याबद्दल हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक, सचिव मधुकर केकाण, सल्लागार अशोक बाबर, अनुरथ कदम, बहिरु कोतकर, रविंद्र भोसले, रामा पानसंबळ, रावसाहेब सांगळे, राजू चोरमले, नवनाथ बडे, संजय महापुरे, लक्ष्मण वायभासे, मच्छिंद्र दहिफळे, गणेश बोरुडे, रत्नाबाई आजबे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी गोविंद सांगळे म्हणाले, हमाल पंचायतच्या माध्यमातून कष्टकार्यांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. हॉस्पिटल, पतसंस्थेच्या माध्यमातून हमालांचे जीवनमान उंचावत आहेत. त्याचबरोबर त्यांचे पाल्यही उच्च शिक्षित होत चांगल्या नोकरी मिळवत आहेत. या मुलांचा सत्कार करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार मधुकर केकाण यांनी मानले.