काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे
शेवगाव(प्रतिनिधी) : काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे. शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा पडखर समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.