किरण अहमदनगर फेस्टिवल, किरण फुटबॉल चॅम्पियनशिप लीगचे उद्घाटन
किरण कराटे प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ना.बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व क्रीडा कॅबिनेट मंत्री ना.सुनील केदार सोमवारी (दि.८) नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.
काळे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दहा दिवसीय किरण अहमदनगर फेस्टिवल – २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
सोमवारी दुपारी २.०० वा. ना. थोरात, ना.केदार यांचे हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राउंड येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. दुपारी २.१५ वा. जिल्हा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधी, शिवछत्रपती विजेते क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्यासमवेत क्रीडा क्षेत्रातील प्रश्नांबाबत महसूल मंत्री व क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
दुपारी २.४५ वा. सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील गुलमोर फुटबॉल क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय किरण फुटबॉल चॅम्पियनशिप लीग – २०२१ चे उद्घाटन, किरण अहमदनगर फेस्टिवल – २०२१ चा शुभारंभ, किरण काळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि किरण कराटे प्रीमियर लीग – २०२१ चा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. हा कार्यक्रम ना.बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक ना.सुनील केदार आहेत.
यावेळी काँग्रेसचे नेते, पुणे जिल्ह्यातील आ संग्रामदादा थोपटे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.निलेश लंके, आ. लहू कानडे, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, एल अँड टी कंपनीचे डायरेक्टर अरविंद पारगावकर, गुलमोहर क्लबचे अध्यक्ष जोएब खान, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, फुटबॉल असोसिएशन सेक्रेटरी गॉडविन डिक, जॉइंट सेक्रेटरी गोपीचंद परदेशी यांच्यासह नगर शहर व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
किरण अहमदनगर फेस्टिवल अंतर्गत ऑनलाईन गायन स्पर्धा, ऑनलाइन तबला वादन स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा, साहित्यिकांशी संवाद कार्यक्रम, शाम – ए – गझल कार्यक्रम, अन्नदान कार्यक्रम, गोशाळेमध्ये चारा वाटप कार्यक्रम अशा विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन दहा दिवस किरण काळे युथ फाउंडेशन व अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विविध फ्रंटल, सेल, विभाग यांच्या वतीने शहराच्या विविध प्रभागांमध्ये करण्यात आले आहे.
किरण काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांसाठी काँग्रेसचे दोन हेवी वेट कॅबिनेट मंत्री आणि आमदार हे नगर शहरात येत असल्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.