कांबी परिसरातील नदीवर तातडीने पुल उभारावा,हर्षदा काकडे यांची मागणी

0
91

शेवगाव प्रतिनिधी – शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे कांबी येथे शनिवार दि.४ सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस होऊन गावालगत असणार्‍या नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी बाजारपेठेतील दुकानात शिरल्याने काही दुकाने वाहून गेली आहेत. यामध्ये टपरीधारक, चपलाचे दुकानदार , कृषी सेवा केंद्र , वेल्डिंगची दुकाने , चहाची हॉटेल आदि छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे नदीकाठच्या बर्‍याच घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांची पडझड झाली आहे. भविष्यात ही परिस्थिती उदभवू नये यासाठी कांबी गावालगत मालेगाव (ता.गेवराई) रस्त्यावरील नदीवर ६ फूट उंचीचा पूल तातडीने करण्याची मागणी जि.प.सदस्या हर्षदाताई काकडे व जनशक्ती मंचचे ऍड.शिवाजीराव काकडे यांनी केली आहे. याबाबत काकडे यांनी नगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता श्री जे.डी.कुलकर्णी साहेब निवेदन दिले.

यावेळी जनशक्ती चे उपाध्यक्ष संजय आंधळे ,भागवत रासनकर नारायण सूर्यभान शिरसागर राजू म्हस्के अशोक तपकीर गणेश होळकर सौरभ राजपूत भाऊसाहेब नामदेव माने पांडुरंग झिरपे संजय मस्के सोमनाथ मतकर सचिन मगर परमेश्वर माने नानासाहेब बोरुडे बाबासाहेब काळकुडे चंद्रकांत मस्के संभाजी टाकळकर उपस्थित होते

काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळै काही नागरिकांचा प्रपंच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. कांबी गावच्या उत्तर बाजूला जी नदी आहे त्या नदीवरील पूल हा कमी उंचीचा आहे. अतिवृष्टीच्या पावसाने नदीला पूर आल्याने सदरचा पूल पूर्णपणे खचला असून पुलाचा काही भाग वाहून गेला आहे . सदरच्या नदीवर पाणी जाण्यासाठीच्या नळ्या कमी उंचीच्या असल्याने पाण्याची कोंडी झाली. गावालगतच वाहणार्‍या पाटाचे ओव्हरफ्लोचे पाणी देखील याच नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने या पाण्यामध्ये अजून भर पडते. त्यामुळे नदीमध्ये पाणी मावत नाही. परिणामी पाणी नदीपात्रात न मावल्यामुळे नदीपात्रात तुंब होऊन पाणी गावात शिरले व पाणी नदीलगतच्या शेतात शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने नदीलगतच्या छोट्या मोठ्या गोरगरीब शेतकर्‍यांचे , व्यावसायिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. भविष्यात हा प्रकार पूर्णपणे थांबविण्यासाठी कांबीकरांवर हा प्रसंग परत उद्भवू नये म्हणून कांबी गावालगत असणार्‍या नदीवर ६ फुट उंचीचा फुल होणे गरजेचे आहे . कारण सदरच्या नदीवरचा पूल काहीठिकाणी खचला आहे तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला आहे. गावातील शेतकर्‍यांना शेतामध्ये जाण्यासाठी व नदी पलीकडील घर व वस्ती कडे जाण्या येण्यासाठी तसेच ग्रामस्थांना मालेगावला जाण्यासाठी याच तुटलेल्या पुलाचा वापर करावा लागत असल्याने ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा पूल कांबी गावासाठी फार महत्त्वाचा असून तो झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. सदर पूल तातडीनेे खास बाब म्हणून करण्यात यावा, अन्यथा कांबी ग्रामस्थांसह कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here