काळीआई मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून आदिवासींच्या जमीनी मुक्त

0
102

अद्यावत तंत्रज्ञानाने शेती फुलविण्याच्या आदिवासी बांधवांचा निर्धार

मौजे खडकवाडी येथे तळीभंडार करुन मोहिमेचे प्रारंभ

जमीनीचे ठिबकवाडी शिवार नामकरण

अहमदनगर प्रतिनिधी – आदिवासींच्या जमीनी आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून मुक्त करुन आदिवासी समाजबांधवांनी ताबा घेतलेल्या मौजे खडकवाडी येथील जमीनीवर अद्यावत तंत्रज्ञानाने शेती फुलविण्याच्या मोहिमेचे प्रारंभ तळीभंडार करुन करण्यात आले. तर संघर्षाने मिळवलेल्या जमीनीचे ठिबकवाडी शिवार नामकरण करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, माजी सरपंच विष्णू मधे, गोविंद चिकणे, राजू चिकणे, लहानू पारधी, जिजाबा चिकणे, शाहिर कान्हू सुंबे,लिंबाजी चिकणे, बबन चिकणे, शेखर साळवे, सिताराम जाधव, धनंजय भुतांबरे, रामदास पारधी, पोपट चिकणे, परशुराम चिकणे, भिमा पारधी, शंकर केदार आदी उपस्थित होते.

मौजे खडकवाडी (ता. पारनेर) येथील गट नंबर ४७१ व ४७२ मधील आदिवासींच्या वारसांच्या १५ हेक्टर ८ आर आणि १३ हेक्टर ६७ आर जमीनीवर बिगर आदिवासी धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमीनीच्या ताब्याला हरकत घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली होती.

मागील आठवड्यात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांनी आंदोलनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरने नांगर फिरवून काळीआई मुक्तीसंग्रामाद्वारे आपला ताबा व जमीनीचा हक्क सिध्द केला.

आदिवासी बांधवांनी खडकाळ शेत जमीन पड ठेवल्याने बिगर आदिवासींनी धनदांडग्यांनी या जमीनी बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र आदिवासी बांधवांनी संघटितपणे लढा दिल्याने बिगर आदिवासींचा प्रादुर्भाव मोडित निघाला आहे.या जमीनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवार फुलविण्यासाठी आदिवासी बांधवांनी कंबर कसली आहे.

आदिवासी नेता बिरजा मुंडा जिंदाबादच्या घोषणा देत, मंगेश खामकर, शंकर साळवे यांच्या हस्ते तळीभंडार करुन प्रगत शेती तंत्रज्ञान मोहिमेची सुरुवात करण्यात आली.या मोहिमेच्या माध्यमातून आदिवासींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या योजनांचा लाभ मिळवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आदिवासी बांधव शेती करणार आहेत.

कमी पाण्याची पिके घेऊन शेतीला चालना देऊन आदिवासींचा विकास साधला जाणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here