काळ भैरवनाथांचा रविवारी आगडगावमध्ये यात्रोत्सव
नगर तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथांची यात्रा रविवारी (ता. २८) भरणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
सालाबादप्रमाणे यात्रोत्सवात कार्यक्रम होतील. रविवारी पहाटे महाआरती, सकाळी कावडीने आणलेल्या पाण्याने जलाभिषेक, दुपारी महाप्रसाद वाटप, संध्याकाळी काठ्यांची मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कावडीनंतर होणाऱ्या महाआरतीला उद्योजक नरेंद्र फिरोदिया, तसेच मान्यवर उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) कुस्त्यांचा हगामा भरणार आहे. राज्यातील मल्ल त्यामध्ये सहभागी होतील. हा हगामा जिल्ह्यात चर्चिला जातो. यात्रेकरू, भाविकांसाठी देवस्थानाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगडगाव, टोकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
आगडगाव हे नगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. गर्भगिरीच्या डोंगरात असलेल्याने पर्यटकीय दृष्ट्या या परिसराला महत्त्व आहे. नगर शहरातील अनेक नागरिक पर्यटनासाठी येतात. राज्यभरातूनच नव्हे, तर परराज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी कावडी मिरवणूक असते. ही विशेष प्रेक्षणीय असते. यात्रेनिमित्त गावातील मुली माहेरी येतात. त्यानिमित्ताने सर्वांच्या भेटी होतात. यात्रेनिमित्त माळीवाडा बसस्थानकापासून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानाजवळ विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहने पार्किंगची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. देवस्थानाजवळ पशुहत्या बंदी आहे. गोड नैवेद्य देवाला दाखवावा, असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -