अहमदनगर प्रतिनिधी – केंद्रीय बालविकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार शहर जिल्हा भाजपाच्यावतीने ८ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील सर्व बुथस्तरावर ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना भैय्या गंधे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशाचे भविष्य असलेल्या लहान बालकांच्या विषयी आपल्या कल्पना मांडल्या होत्या. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपाचे कार्यकर्ते आपल्या बुथ परिसरातील घरोघरी संपर्क करून ६ वर्षेपेक्षा लहान बालकांची Poshan Tracker App वर नोंदणी करतील. सुदृढ बालकांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगितले.
या सुदृढ बालक-बालिका अभियानाच्या अहमदनगर शहरातील प्रमुख कॅन्टोन्मेंट सदस्या शुभांगी साठे असून संयोजिका कालिंदि केसकर ,वंदना पंडित असून, डॉ. आशिष बोरकर, डॉ.विलास मढीकर हे सह संयोजक आहेत. तर खासदार डॉ सुजय विखे हे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
अहमदनगर शहरातील भाजपच्या सर्व बुथप्रमुख, मंडलप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम करून आपल्या परिसरात हे अभियान राबवून लहान बालकांसाठीची ही योजना यशस्वी करावी व यासंदर्भात अधिक माहिती व मदतीसाठी भैय्या गंधे संपर्क कार्यालय, गुलमोहर रस्ता, नगर येथे संपर्क करावा असे आवाहन केले आहे.