केडगावच्या किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खरी संपत्ती म्हणजे आपली संतती -डॉ. प्रविण महाराज दुशिंग
किर्तनातून मुलांना संत, ग्रंथ, महंत, भगवंत समजवून सांगण्याचा दिला संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. किर्तनात भाविक तल्लीन होत असून, किर्तनातून समाज प्रबोधन देखील केले जात आहे. जनसेवक श्री. अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
स्व. सुभाष कोंडीराम वाघ यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प ह.भ.प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटिल यांनी गुंफले. दुशिंग महाराज म्हणाले की, येणारी पिढी टिकवायची व घडवायची असेल तर चांगले संस्कार देण्याची गरज आहे. संस्कार नसल्याने आजची पिढी चुकीच्या मार्गाला जात असून, अनेक व्यसन जडताना दिसत आहे. खरी संपत्ती म्हणजे आपली संतती आहे. मुलांना घडविण्यासाठी आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते, त्याप्रमाणे त्यांना बिघडण्यासाठी देखील आई-वडिलच जबाबदार असतात.
मुलांच्या हातात लहानपणापासूनच मोबाईल दिला जात आहे. तर आई टिव्हीचे सिरीयल पाहण्यात गुंतली आहे. तर वडिल कामानिमित्त घराबाहेर असतात. यामुळे संस्कारापासून मुली दुरावत आहे. मुलांना संत, ग्रंथ, महंत, भगवंत समजवून सांगण्याची वेळ आहे. मुलांवर योग्य संस्कार रुजल्यास आई-वडिलांना वृध्दाश्रमात जाण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या किर्तनाने सर्व उपस्थित भाविक भावूक झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सदस्य व मित्र परिवार परिश्रम घेत आहे.