अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता चळवळ सर्वांनी कृतीत उतरवली पाहिजे. स्वच्छतेची ठेवा जान स्वच्छतेने बनेल देश महान!, या प्रमाणे सर्वांनी स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होऊन कार्य केल्यास सर्वांना सदृढ आरोग्य लाभेल. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता याकडे स्वतः जबाबदारीने लक्ष देण्याची गरज आहे. ओला कचरा, सुका कचरा व हॉस्पिटलचा कचरा आदींची विभागणी करून व्यवस्थापन झाल्यास रोगराईला आळा बसणार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी केले.
कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथे अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य व नर्मदा फाउंडेशनच्या वतीने मतदार जागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अॅड. तोडकर बोलत होते. प्रारंभी वृक्षरोपणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, मुख्याध्यापक बी.एन. नाईकवाडे, ग्रामविकास अधिकारी एस.सी. गिर्हे, सुरेश शिरसाठ, संदीप बनकर, महिपती शिरसाठ, श्रीधर शिरसाठ, प्रवीण कानडे, किशोर घोगरे आदी उपस्थित होते.
सरपंच प्रकाश पाटील म्हणाले की, लोकशाहीच्या समृद्धीसाठी व गावाच्या विकासासाठी शंभर टक्के मतदान आवश्यक आहे. युवक-युवतींनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून पुढाकार घेण्याची गरज आहे. युवाशक्ती निवडणुक प्रक्रियेत सहभागी झाल्यास बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, अॅड. अनिता दिघे, पोपट बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.