आमदार संग्राम जगताप यांच्याकडून विद्यार्थ्याचे विशेष कौतुक
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
कोरोनाबाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये जाऊन योग, प्राणायामाचे धडे देणार्या अकरा वर्षीय विराज बाबासाहेब बोडखे या विद्यार्थ्याचा गौरव आमदार संग्राम जगताप यांनी केला.
यावेळी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, विकास डावखरे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे निलेश बांगर, उद्योजक भगवान कातोरे, भगवान राऊत, आप्पासाहेब भनगडे, माजी नगरसेवक आसाराम कावरे, शिक्षक परिषद कार्याध्यक्ष बबन शिंदे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अकरा वर्षीय विराज बोडखे याने कोरोनाला न घाबरता इतर रुग्णांच्या सदृढ आरोग्यासाठी कोविड सेंटरमध्ये जाऊन योग, प्राणायामाचे धडे दिले.कोरोना रुग्णांना मार्गदर्शन करुन त्यांच्यामध्ये एकप्रकारे आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले.स्वत: व कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाली असताना त्यांनी विविध व्यायाम व आहाराबद्दलची दिलेली माहिती रुग्णांना उपयुक्त ठरली.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन विराज बोडखे यांने लहान वयातच सामाजिक योगदान देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना संकट असो की, कोकण येथील महापूर बोडखे परिवाराने सामाजिक बांधिलजी जोपासून गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, आमदार संग्राम यांनी कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार दिला. तर कोरोनाच्या संकटात काम करणार्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांचे मनोबळ वाढविले.लहान मुलाने केलेल्या कार्याचा सन्मान करुन त्याला आनखी सामाजिक कार्य करण्यास एक प्रकारे बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
विराज हा शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांचा मुलगा आहे. तो गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. त्याने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या कार्याचे आमदार अरुणकाका जगताप यांनी देखील कौतुक केले.