अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य संग्रामातील थोर व्यक्ती व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख, काशीनाथ पळसकर, बाळासाहेब गायकवाड, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, गुलाब गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी समाजातील शिक्षण व्यवस्थेत गरीब व श्रीमंत अशी दोन वर्ग निर्माण झाले आहेत. काही पंचतारांकित शिक्षण संस्थेत तर काही सर्वसामान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवीत आहे. तर कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांपुढे उदरनिर्वाह व शिक्षणाच्या खर्चाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
साहेबराव बोडखे म्हणाले की, उच्च शिक्षण हेच परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे. स्पर्धेच्या युगात गुणवत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही समाजात अनेक गरजू घटकातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे. शिक्षणाच्या वयात वेळ वाया न घालवता ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळणार आहे. शिक्षणाने सर्वांगीन विकास होऊन बदल घडणार असल्याचे सांगून, त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात संकेत जाधव, तृप्ती गायकवाड, साहिल कदम, प्राची सोनवणे, मंगेश जाधव या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.