लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना व बहुद्देशीय कामगार संघटनेची मागणी
समाजबांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध
अन्यथा शहरातून कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा घेऊन बसविण्यासाठी जाणार -साहेबराव काते
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना व बहुद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंधार येथील गऊळ गावात (जि. नांदेड) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवून समाजबांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तर त्याच जागेवर सन्मानपुर्वक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पुन्हा बसविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव काते, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, सुशिला काते, रेखा भोगले, सिताबाई रोकडे, शंकर काते, सिमा काते, राजू काते, विनोद वैरागर, मच्छिंद्र वैरागर आदी उपस्थित होते.
पुरोगामी महाराष्ट्रात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा विसर पडल्याने हा प्रकार घडला आहे. ज्या व्यक्तीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिले. कष्टकरी, कामगार, श्रमिकांचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडले. अशा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राजकीय समाजकंटकांनी विरोध करुन पोलीसांवर दबाव टाकून करण्यात आलेल्या लाठीचार्जचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तर लाठीचार्जला जबाबदार असणार्या संबंधित पोलिस अधिकार्याचे निलंबन करुन कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणी देखील करण्यात आली आहे. सदर मागण्यांचा विचार न केल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
—————————-
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी वंचित कामगारांचे प्रश्न आपल्या शाहिरीतून मांडले. त्यांचा त्याग न विसरता येणारा आहे. मात्र काही जातीयवादीवृत्तीचे लोक राजकारणासाठी विशिष्ट समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. गऊळ गावात हटविण्यात आलेला पुतळा त्या जागेवर पुन्हा प्रशासनाने बसवावा. अन्यथा शहरातून कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा घेऊन जाऊन तेथे बसविणार असल्याचा इशारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव काते यांनी दिला आहे.