अहमदनगर प्रतिनिधी – आज गांधी जयंतीचे औचीत्त्य साधून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज अससोसिएशन ने बँक खाजगीकरण विरोधात कोरोना मुळे स्थगित सह्यान्च्या मोहिमेला पु:नश्च शुभारंभ केला.
अहमदनगर शहरात या प्रसंगी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉयीइज फेडेरेशन चे सरचिटणीस कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याचा शुभारंभ केला.
यावेळी त्यांनी संबोधित करतांना सांगितले कि १९ जुलै १९६९ रोजी त्यावेळच्या पंतंप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. परिणामी देशात हरित क्रांती, औद्योगिक क्रांती रोजगार निर्मिती होऊन सावकारीचे उच्चाटन झाले. त्यामुळे छोट्या व माध्यम उद्योगांना चालना मिळाली तसेच कृषी क्षेत्रात प्रगती घडून आली. त्याचा सार्वत्रिक परिणाम हा देशाच्या विकासावर झाला. देशात विविध बाजारपेठा निर्माण झाल्या व त्या ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली.
बँकांचा ग्रामीण भागात विस्तार झाल्याने तळागाळातील माणसापर्यंत बँकिंग सेवा उपलब्ध झाली.परंतु कालांतराने आपल्या देशाने जागतिकारण खाजगीकरण व आधुनिकीकरणाचा स्वीकार केल्याने मोठ्या उद्योगांना प्राधान्य दिले जाऊ लागले. यातून रोजगार निर्मितीला खीळ बसली बेरोजगारांची संख्या वाढली. छोटे उद्योग धोक्यात यायला सुरवात झाली.
सरकारने खाजगी बँकांना परवानगी देण्याचे धोरण अमलात आणण्याचा घाट घातला. परंतु बँकिंग क्षेत्रात खाजगी बँकांचा इतिहास पाहता अनेक बँक बुडीत झाल्याचे व या बँकांचे सरकारी बँकांत विलीनीकरण केल्याचे दिसून येते.त्याचप्रमाणे गेल्या तीन दशकापासून बँकांमध्ये गैर उत्पादक कर्जाचे प्रमाण फारच वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
यामध्ये मोठ्या भांडवलदारांचा व औद्योगिक घराण्यांचा समावेश असून सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यासाठी पाऊले न उचलता त्यांना अभय देत आहे व त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करून त्यांना मदत करत आहे.परंतु हेच भांडवलदार आपले उद्योग तोट्यात दाखवून बंद करण्याची प्रक्रिया करून या कर्जाचे रूपांतर अनुत्पादक कर्जात करतात व असे उद्योग कवडीमोल भावात काढून त्यांना करोडो रुपयांची सूट दिली जाते.
हि सर्वसामान्य ग्राहकांच्या बचतीची लूटच आहे. हेच भांडंवलदार या सरकारी बँक विकत घेण्याच्या मार्गावर असून एक जागरूक बँक कर्मचारी संघटना म्हणून बँक कर्मचाऱ्यांचा त्याला कडाडून विरोध आहे.
सद्य परिस्थितीत बंद असलेल्या बँकांकडे पहिले असता आपणास दिसून येईल कि त्यांच्या ग्राहकांच्या ठेवी अद्याप परत मिळालेल्या नाहीत.बँकांचे खाजगीकरण झाल्यास ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता काय? असा प्रश्न समोर उभा राहतो.
आज देशात खाजगीकरणाची नव्हे तर रोजगार निर्मिती ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्याची व महत्वाचे म्हणजे नॉन परफॉर्मिंग कर्जाची सक्तीने वसुली करणे याची गरज आहे.यासाठी कायद्यात सुधारणा करून ते अधिक कडक करावे कर्ज बुडव्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी कर्ज बुडविणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा अश्या प्रकारच्या सूचना संघटनांकडून वेळोवेळी केल्या गेल्या आहेत.
परंतु सरकार याकडे सोपस्कार दृष्ट्या दुर्लक्ष करत असून सर्वसामान्यांच्या ठेवी बड्या भांडवलदारांच्या घशात घालू पाहत आहे. यामुळे उद्भवणारे धोके वेळीच लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेने बँक कर्मचारी संघटनांना आपला पाठिंबा द्यावा व या चळवळीमध्ये आपले योगदान द्यावे असे कॉम. देविदास तुळजापूरकर जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉयीस फेडेरेशन यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करतांना संबोधित केले.
तसेच आजपासून बँक कर्मचाऱ्यांनी जी सह्यांची मोहीम सुरु केली आहे त्याला सर्वसामान्य नागरिकांनी सह्या करून आपला खाजगीकरणाला विरोध असल्याचे नमूद करावे व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. ग्राहकांनी वेळीच जागे होण्याची हीच योग्य वेळ आहे अन्यथा आपल्या कष्टाच्या ठेवींची सुरक्षितता हि धोक्यात येऊ शकेल.
पुढील आठवडाभर विविध भागात हि सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहमदनगर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लॉईज अससोसिएशन चे सरचिटणीस कॉम. कांतीलाल वर्मा यांनी सांगितले.
यावेळी कॉम उल्हास देसाई कॉम. शिवाजी पळसकर कॉम. सुजय नळे कॉम उमाकांत कुलकर्णी कॉम आशुतोष फळे कॉम अमोल बर्वे कॉम. प्रकाश कोटा कॉम राहुल कॉम. सुनील कॉम सायली शिंदे कॉम. पावन चौधरी कॉम जेऊरकर कॉम. प्रवीण मेहेत्रे तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.