गुरुवारी होणार रमजान ईद साजरी
ईदगाह मैदानावर सकाळी 10 वाजता सामुदायिक नमाजचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) गुरुवारी (दि.11 एप्रिल) साजरी होणार आहे. बुधवारी चंद्र दर्शन झाल्याने गुरुवारी ईद उत्साहात साजरी होत आहे. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात होणार आहे. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असून, या रस्त्यावरील वाहतुक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.
मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का मदिना येथे बुधवारी ईद साजरी करण्यात आली. रमजान महिन्याचे 30 उपवासनंतर गुरुवारी शहरासह भारतातील अनेक राज्यात ईद उत्साहात साजरी होत आहे. तसेच शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 10:20 वाजे पर्यंत ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविक आपल्या सोयीप्रमाणे नमाज अदा करणार आहेत. तर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान व दर्गामध्ये दर्शनास भाविकांची गर्दी राहणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रात्री शेवटच्या दिवसा पर्यंत खरेदीसाठी मोठी गर्दी होती.
ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईद निमित्त घरोघरी शीरखुर्मा, शेवई, गुलगुले व बिर्याणीचा बेत असतो. मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत असतात व नातेवाईकांना भेटण्यासाठी जातात.