गृहमंत्री साहेब, माझ्या नावे ३० लाखांची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडचा आधी तपास लावा  

विधानसभेच्या रिंगणातून बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट – किरण काळे ; 

“त्यांना” केडगाव शिवसैनिक हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची आहे

गृहमंत्री साहेब, माझ्या नावे ३० लाखांची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडचा आधी तपास लावा  

अल्पवयीन मुलांची धींड काढली, पोस्को का लावला नाही ? 

अधिवेशन काळात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार 

प्रतिनिधी : राज्यात सध्या गाजत असणाऱ्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काहींच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिलाचा आरोप अर्ध नग्न प्रकरणातील आरोपींनी केला होता. याबाबत काळे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, मी कुणाची सुपारी दिली नसून विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून रिंगणातच दिसू नये म्हणून माझा खून करत मला कायमचा बाद करण्यासाठी माझ्याच हत्येचा कट शिजवला जात असल्याचा मला दाट संशय आहे. शिवसैनिकांच्या केडगाव हत्याकांडाची पुनरावृत्ती करत माझी हत्या काही लोकांना करायची आहे असे यातून दिसते. गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते. शहरात काही लोक स्वतःला कार्यसम्राट समजतात. राजकारणात विरोधकाला राजकीय पद्धतीने जरूर विरोध करावा. मात्र त्याचा अशा प्रकारे कायमचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचू नयेत. शहरातील राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे. मात्र अशा प्रकारांना घाबरून शहर भयमुक्त करणे आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे माझे काम यतकिंचितही थांबणार नाही. नगरकरांच्या भल्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, असा सज्जड इशारा काळे यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला आहे.

तो मास्टरमाईंड आधी शोधा : 

माझ्या नावाचा गैरवापर करत कोणी तीस लाखांची सुपारी दिली ? कधी, कुठे दिली ? यासाठी कुठला ॲडव्हान्स दिला गेला आहे का ? तो कोणी फायनान्स केला ? त्याॲडव्हान्स मधून रीवॉलव्हर घेण्यात आली आहे का ? असेल तर कुठून घेतले आहे ? कोण अवैद्य हत्यारांचा पुरवठा करत आहे ? या सगळ्यांचा पोलिसांनी तपास करावा. यासाठी ताब्यात असणारे, फरार झालेले दोन्ही गटांचे आरोपी यांचे सीडीआर, एसडीआर, टॉवर लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग काढण्यात याव्यात. यांनी कुणाची भेट घेतली, ते कोणा कोणाच्या संपर्कात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आहेत ते अन्य कोणाच्या संपर्कात आहेत, या सगळ्याचा धागा दोरा शोधून काढून खऱ्या मास्टरमाईंड पर्यंत पोलीसांनी पोहोचावे आणि संभाव्य हत्याकांड घडू नये यासाठी सखोल तपास करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केली आहे.

माझेही कॉल डिटेल्स तपासा : 

या प्रकरणातील दोन्ही गटातील कोणत्याही आरोपींशी माझा केव्हाही संपर्क आलेला नाही. भेट झालेली नाही. अशा लोकांशी मी का संपर्क ठेवू ? असे चुकीचे संस्कार माझ्यावर नाहीत. याची शहानिशा करण्यासाठी माझेही कॉल डिटेल्स, सीडीआर पोलिसांनी तपासावेत. लगेच दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे किरण काळे यांनी पोलिसांना जाहीर आवाहन केले आहे.

यापूर्वी पण असेच बनाव, पण प्रत्येक वेळी मी निर्दोष :

शहरातील तथाकथित कार्यसम्राटांचा यापूर्वी आयटी पार्क बनाव प्रकरणी भांडा फोड मी काँग्रेस कार्यकर्त्यांसह इन कॅमेरा केला होता. पण त्यांच्याच दबावातून माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. एमआयडिसी पोलिसांनी सखोल तपास करून विनयभंग व्हायला फिर्यादीच घटनास्थळी हजर नव्हती, त्यामुळे फिर्यादच खोटी असल्याचा अहवाल मे. न्यायालयात सादर केला आहे. तथाकथित चावला हाफ मर्डर प्रकरणात देखील माझे नाव गोवण्यात आले होते. मात्र त्याही तपासात माझा दुरान्वये देखील संबंध नसल्याचे समोर आले आहे. आता माझ्या नावाचा गैरवापर करत हत्येची सुपारी देऊन माझीच हत्या घडवण्याचा कट रचला गेला आहे. यापूर्वी खोटी ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. प्रत्येक वेळी मी निर्दोष असल्याचे समोर आले आहे असे काळे यांनी म्हटले आहे.

बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा : 

शहराच्या तथाकथित कार्यसम्राट आमदारांचा माझ्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. यासाठी काही माता-भगिनींना पैशांचे आमिष दाखवून, धमकावून पुढे करण्याचे काम सुरू आहे. यासाठी भाडोत्री लोकांचा वापर केला जात आहे. केवळ विधानसभेला उमेदवार म्हणून किरण काळेचे आव्हान आपल्याला समोर नको म्हणून वारंवार षडयंत्र रचले जात आहेत. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्य वेळी कार्यसमार्टांच्या या षडयंत्राचे पुरावे जनतेसमोर आणून त्याचा मी भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काळे यांनी शहराच्या आमदारांचे नाव घेत दिला आहे. पोलिसांनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी महिला भगिनी आल्यास आधी पुराव्यांची पडताळणी करावी. पुरावांमध्ये तथ्य असेल तरच तर गुन्हा दाखल करावा. मात्र खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक, राजकीय चळवळीत जनहिताचे काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उध्वस्त करण्याच्या षडयंत्राला कदापि साथ देऊ नये, असे किरण काळे यांनी पोलिसांना आवाहन केले आहे.

आरोपींची ऑडिओ क्लिप आली समोर :  

या प्रकरणातील आरोपींची सुमारे १ तास १७ मिनिटांची ऑडिओ क्लिप समोर आली. काळे यांनी प्रसार माध्यमांना ती उपलब्ध करून दिली. यामध्ये विद्यमान खा. निलेश लंके, माजी खा. सुजय विखे यांचाही नामोल्लेख आहे. या क्लिपमध्ये अटकेत असलेल्या प्रवीण गीतेला उडवायची तीस लाखांची सुपारी मिळाली आहे. पंधरा लाख रुपये ॲडव्हान्स व बाकीची रक्कम काम झाल्यानंतर मिळणार आहे. पंधरा लाख मिळाल्यानंतर सहा रीवॉलव्हर आणायच्या. सहा जणांनी गीतेच्या हॉटेलवर जाऊन एकाच वेळेस फायर करायची. दोन-तीन जणांचा नेम चुकला तरी दोन-तीन जणांच्या गोळ्या लागतील व काम फत्ते होईल असा उल्लेख या क्लिप मध्ये आहे. किरण काळे आमदारकीला उभा राहणार असल्याने यांना ठोकायला  तो आपल्याला खूप पैसे देईल असाही उल्लेख या क्लिप मध्ये आहे. ऑडिओ क्लिप मधील व्हॉइस सॅम्पल घेऊन या क्लिपच्या अनुषंगाने पोलिसांनी याचे धागेदोरे शोधून काढण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

३० लाखांच्या सुपारीचा फिर्यादीत उल्लेख आहे का ? : 

जर एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत तर त्यामध्ये तीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आणि माझ्या नावाचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मला समजली आहे. पोलीस अहवाल पाहिला तर त्यात देखील या संदर्भातला कोणताही उल्लेख आढळून येत नाही. याबाबतची माहिती पोलिसांनी जाहीर केली पाहिजे. जे आरोपी अटकेत आहेत तेच म्हणतायेत की तीस लाखांची सुपारी दिली तर मग तशी फिर्याद त्यांनी का दिली नाही ? त्यामुळे हा केवळ राजकीय पुरस्कृत षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप किरण काळेंनी केला आहे.

धिंड का काढू नये ? आरोपींचे धक्कादायक विधान : 

 त्या अल्पवयीन मुलांची दिंड का नाही काढावी याच आम्हाला उत्तर द्या, असं धक्कादायक विधान प्रसारमाध्यमांना बाईट देताना अटकेत असणाऱ्या आरोपींनी केले आहे. मुळात समाजात अशी धिंड काढून दहशत निर्माण करणाऱ्यांचीच धिंड पोलीस काढणार आहेत की नाही ? अन्यथा समाजामध्ये उद्या कोणीही दहशत निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळावे, असे आवाहन किरण काळे यांनी केले आहे.

यापूर्वीचं गीतेचा हकालपट्टीचा प्रस्ताव पक्षाला पाठवला आहे : 

प्रवीण गीते हा शहर युवक काँग्रेसचा प्रवक्ता आणि युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. तशी नियुक्ती त्याची युवक जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यापूर्वीच गीतेच्या हकालपट्टीचा प्रस्ताव पक्षाला पाठविला आहे. त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षित आहे.

गीतेचा बोलविता धनी दुसराच : 

काँग्रेस पक्षांतर्गत दुही असल्याचे चित्र निर्माण करायचे. प्रवीण गीते सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरायचे. अशा लोकांना काँग्रेस पक्षात ठरवून पाठवायचे. गीते काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांचा कार्यकर्ता होता. त्या माध्यमातून तो शहराच्या आमदारांसाठी काम करायचा. आजही करतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्याला जाणीवपूर्वक काँग्रेसमध्ये पेरले होते. पक्षातील हालचालींची माहिती तो त्यांना पुरवायचा. गीते हा पुढे केलेला मोहरा आहे. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यास खरा मास्टरमाइंड समोर येईल, असा दावा काळे यांनी केला आहे.

काळेंवर सुपारीचा आरोप करणाऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी :

दरम्यान, किरण काळेंवर गंभीर आरोप करणाऱ्या आरोपींनाच पोलिसांनी अटक केली असून यामध्ये प्रवीण शरद गीते, विशाल जालिंदर काटे, विशाल दीपक कापरे, हर्षद गौतम गायकवाड या चार आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. आधी हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांच्याकडे तपास देण्यात आला होता. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चव्हाण यांना हटविण्यात आले असून पीएसआय विनोद परदेशी यांच्याकडे आता तपास सोपवण्यात आला आहे.

पोस्को का नाही ? : 

ज्या अल्पवयीन मुलांची धिंड प्रवीण गीते आणि त्याच्या साथीदारांनी काढली त्याबाबतची फिर्याद नोंदविताना फिर्यादी अल्पवयीन आहेत हे माहीत असून देखील चाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट, २०१२ मधील तरतुदीनुसार पोस्को लावण्याची तरतूद आहे. तरी देखील पोस्को एमआयडीसी पोलिसांनी का लावला नाही ? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे ? यामागे कोणाचा दबाव आहे ? अल्पवयीन मुलांची अर्ध नग्न धिंड काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. असे असताना देखील त्या घटनेचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही हे धक्कादायक आहे. हे रेकॉर्डवर का आणले गेले नाही ? ज्यांनी धिंड काढली त्यांची आधी फिर्याद नोंदवून घेण्यात आली. मात्र अल्पवयीन मुलांचे पालक एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन टाहो फोडत तक्रार करत असताना देखील त्यांची फिर्याद एक दिवस उशिराने नंतर का नोंदवली ? असे अनेक सवाल काळे यांनी उपस्थित करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

माझी हत्या झाल्यास आमदार पिता – पुत्र जबाबदार : 

माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास या प्रकरणातील सर्व संबंधित आणि त्याचे मास्टरमाईंड, शहराचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप हे जबाबदार असतील. शहरात यापूर्वी अनेक हत्याकांड झाली आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या केडगाव दुहेरी हत्याकांडाप्रमाणे माझी हत्या घडल्यास या लोकांना जबाबदार धरण्यात यावे. माझ्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची आहे, असे गृहमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles