गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीने घेतलेल्या गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ करुन फिरोदिया शिवाजीयन्सने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत शेवट पर्यंत फिरोदिया शिवाजीयन्सने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजयी घौडदौड कायम राखली.
विजयी संघ फिरोदिया शिवाजीयन्सला 9 हजार रुपये रोख व चषक व उपविजयी ठरलेला सुमन इंटरप्रायजेस संघास 5 हजार रुपये रोख व चषक डिक परिवाराच्या वतीने प्रदान करण्यात आले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, कॉलीन डिक, प्राची डिक, उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार जोगासिंह मिनास, ऋषपालसिंग परमार, सहसचिव विक्टर जोसेफ, प्रदिपकुमार जाधव, रणबीरसिंह परमार, जेव्हिअर स्वामी, पल्लवी सैंदाणे, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, राजू पाटोळे आदी उपस्थित होते.
भुईकोट किल्ला मैदान येथे मागील सहा दिवसापासून फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरु होता. अंतिम सामना फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द सुमन इंटरप्रायजेस संघात झाला. पहिल्या हाफच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमक खेळी करणाऱ्या फिरोदिया शिवाजीयन्सकडून रोहन देठे याने एक गोल केला. तर दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच रोशन रिकामे याने फिरोदिया शिवाजीयन्सकडून दुसरा गोल करुन विजय निश्चित केला. शेवट पर्यंत सुमन इंटरप्रायजेसला एकही गोल करता आला नाही. शेवट पर्यंत फिरोदिया शिवाजीयन्स प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरले. 2-0 गोलने फिरोदिया शिवाजीयन्स संघ विजेता ठरला.
मनोज वाळवेकर म्हणाले की, शहरात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी गॉडविन डिक यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळे या खेळाला चालना मिळाली असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कॉलीन डिक यांनी विजयी, उपविजयी संघाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अहदमनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली डिक परिवाराच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 12 फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला होता. नॉकआऊट पध्दतीने सर्व सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट प्लेअर- ओम म्हस्के, बेस्ट स्कोअरर- हिमांशू चव्हाण, बेस्ट गोलकिपर- हिमालय लोंढे यांनी वैयक्तिक बक्षिसे पटकाविली. शिस्त व नियमांचे पालन करणारे उत्कृष्ट संघ म्हणून गुलमोहर एफसीला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिषेक सोनवणे, जॉय जोसेफ, सुमित राठोड, अक्षय चित्ते यांनी काम पाहिले. सामन्याचे समालोचन अरविंद कुडिया यांनी केले.
- Advertisement -