घर घर लंगर सेवेची मतदार जागृती
अन्न छत्रालयाबाहेर मतदार जागृतीच्या सेल्फी पॉइंटचे अनावरण
पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान होणे लोकशाहीला घातक -धनंजय भंडारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात सेवादारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून, अन्न छत्रालयाबाहेर मतदार जागृतीसाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉइंटचे अनावरण लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या हस्ते झाले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, मुन्नाशेठ जग्गी, कैलास नवलानी, सोमनाथ चिंतामणी, प्रशांत मुनोत, राजू जग्गी, प्रमोद पंतम, जय रंगलानी, राहुल बजाज आदी उपस्थित होते.
अन्न छत्रालयात जेवणाचे पाकिट घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य कामगार वर्ग, रुग्णाचे नातेवाईक व गरजू घटकांना लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करुन, जसे पोटासाठी जेवण तसे देशासाठी मतदानचा संदेश देण्यात येत आहे. तर सेल्फी पॉइंटवर फोटो घेऊन नागरिकही मतदार जागृती करत आहे. सेल्फी काढू मतदानही करु!, माझे मत माझे भविष्य.., मताचा अधिकार लोकशाहीचा सन्मान… आदी घोषवाक्य सेल्फी पॉइंटवर लिहिण्यात आलेले आहे.
धनंजय भंडारे म्हणाले की, शंभर टक्के मतदान झाल्यास चांगला व सक्षम उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे. पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान होणे हे लोकशाहीला घातक आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन लोकशाही सक्षम करण्याचा प्रत्येक भारतीयाने संकल्प करण्याचे सांगितले.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. मतदान हे आपल्यासह भावी पिढीचे भवितव्य घडविणारे आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. जनक आहुजा यांनी आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असून, प्रत्येकाने मताचा अधिकार बजावण्याचे स्पष्ट केले.