चर्मकार संघर्ष समितीच्या जिल्हा,तालुका व शहर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

0
100

चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नावर विचारमंथन

समाजाचा सर्वांगीन विकास स्तर उंचावण्यासाठी संघर्ष समिती प्रयत्नशील – शिवाजी साळवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजातील विविध प्रश्‍न सोडवून, दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी व युवकांना दिशा देण्याकरिता चर्मकार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कार्य क्षेत्र असलेल्या समितीच्या जिल्हा, तालुका व शहर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तर समाजाला विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी संघटनेचे पुढील ध्येय-धोरण ठरविण्यासाठी नगर-मनमाड रोड येथील हॉटेल संजोगमध्ये घेण्यात आलेल्या बैठकित समाजाच्या विविध प्रश्‍नावर विचारमंथन करण्यात आले.
महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन चर्मकार संघर्ष समितीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. हनुमान महाराज सातपुते यांच्या हस्ते झाले.

समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहोकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुभाषराव भागवत, युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खरात, बापूसाहेब देवरे, पोपट बोरुडे, विठ्ठल जयकर, लक्ष्मण साळे, संजय साळवे, बाबासाहेब सोनवणे, बाबासाहेब तेलोरे, नंदकुमार गायकवाड, आश्रू लोकरे, दत्तात्रय काटकर, कल्पना एडके, सुरेखा साळवे, मनीषा जयकर, नलिनी लोहोकरे, रेखा तेलोरे, सुमन बोरुडे, मनीषा साळे आदींसह चर्मकार समाज बांधव, महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रात चर्मकार संघर्ष समिती कार्य करणार आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा समितीचा मुख्य उद्देश आहे. कोरोना संकटानंतर चर्मकार समाजापुढे अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. ते शासन स्तरावर सोडविण्यासाठी संघर्ष समिती कार्य करणार आहे. मुंबईसह इतर शहरात गटई कामगारांना बसण्याचा पिचपरवाना कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. चर्मकार उद्योग महामंडळाच्या वतीने समाजातील युवकांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज देण्यात आले नसल्याने, समाजातील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.

युवकांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होण्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे. कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबातील सदस्याला पाच लाख कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.या प्रश्‍नाबाबत मुख्यमंत्र्यांशी समितीचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे सांगितले. तर बहुसंख्य समाज हा मागासलेला असून, त्यांचा सर्वांगीन विकास स्तर उंचावण्यासाठी संघर्ष समिती प्रयत्नशील राहणार आहे. चर्मकार संघर्ष समिती अराजकीय संघटना असून, शिवाजी महाराज, शाह,ू फुले, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे म्हणाले की, संघर्षातून समाजातील प्रश्‍न सुटणार आहे. हा संघर्ष सविनय कायदेशीर मार्गाने केला जाणार आहे.समाजातील लोकप्रतिनिधींनी चर्मकार समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा त्यांच्या विरोधात देखील समाज भूमिका घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

युवक प्रदेशाध्यक्ष सुभाषराव भागवत यांनी उपेक्षित समाजाला न्याय मिळण्यासाठी समितीच्या माध्यमातून युवकांचे संघटन केले जाणार आहे. समाजाचा विकास साधण्यासाठी युवकांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने युवक या समितीमध्ये एकवटत असून, समाजात विकासाची क्रांती होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात यांनी समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी समिती प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

ह.भ.प. हनुमान महाराज सातपुते यांनी समाज जागृक होऊन एकवटल्यास त्या समाजाचा विकास होत असतो. याची मुहुर्तमेढ चर्मकार संघर्ष समितीने रोवली असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या बैठकित समाजातील विविध प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. चर्मकार संघर्ष समितीच्या स्थापनेसाठी विशेष योगदान देणारे शिवाजी साळवे यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी अहमदनगर जिल्हा, तालुका व शहरातील सत्तरपेक्षा जास्त पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उपस्थितांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत खरात यांनी केले. आभार बाळकृष्ण जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here