चास येथे कला पथकाच्या माध्यमातून स्वच्छता व मतदार जागृती

0
81

अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) गावात कला पथकाच्या माध्यमातून स्वच्छता व मतदार जागृती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवडा व मतदार जागृती अभियानातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

चास ग्रामपंचायत कार्यालया समोर गीतकार सुनिल महाजन व त्यांच्या पथकातील कलाकारांनी विविध गीतांद्वारे सार्वजनिक स्वच्छता व मतदार जागृतीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात चासचे सरपंच राजेंद्र गावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपसरपंच युवराज कार्ले, निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, अंबादास रासकर, रावसाहेब देवकर, डि.के. काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, सुनिल गोंडाळ, उमाकांत सोनवणे, किसन गावखरे, संदीप कार्ले, रघुनाथ कार्ले, राजेंद्र जाधव, अंकुश काळे, संजय जाधव आदी उपस्थित होते.

गीतकार सुनिल महाजन यांनी गीतांमधून प्रलोभन, दबाव व आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे व गावातील रोगराई हटविण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. सरपंच राजेंद्र गावखरे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. यासाठी शासनाकडून देखील गाव निर्मळ व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्रामस्थांनी या लोकचळवळीत योगदान देण्याची गरज आहे. तर लोकशाहीत मतदार हा राजा असून, त्याच्या मताला महत्त्व आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी सार्वजनिक स्वच्छता न पाळल्याने समाजामध्ये रोगराई पसरत आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. सार्वजनिक स्वच्छता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनली पाहिजे. आपले सरकार व लोकप्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य मतदारांना मताच्या रुपातून मिळाले असून, अमुल्य व राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या मतदानाचे हक्क बजावण्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here