चिचोंडी पाटीलमध्ये जागा बळकाविणारा तो सामाजिक कार्यकर्ता व गावगुंडांची आयजी कडे तक्रार
घर पेटविणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हावे
अहमदनगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे गुरुवारी (दि.4 एप्रिल) पहाटे जागा बळकाविण्याच्या उद्देशाने घरावर पेट्रोल ओतून पेटविल्याप्रकरणी व गटनंबर 1026 मधील 7-12 उताऱ्यावर बेकायदेशीर खाडाखोड करून स्वतःचे नाव लावून ताबा मारणारा तो सामाजिक कार्यकर्ता, काही गावगुंड व तत्कालीन तलाठी, सर्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार राजू कोळी, रेश्मा कोळी, कौसाबाई सरोदे व अन्याय निवारण सेवा समितीचे अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट आयजी बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे तक्रार केली.
गुरुवारी पहाटे चिचोंडी पाटील येथील नगर-जामखेड रस्त्यालगतच्या घराला पाठीमागच्या बाजूने पेट्रोल ओतून घराला आग लावून देण्यात आली. मी व पत्नी रस्त्यालगतच्या स्वतःच्या मालकीच्या हॉटेलच्या खोलीत झोपले असताना जीव वाचला. सदर राहत असलेल्या जागेचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राहत असलेले घर व हॉटेल ही जागा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता व काही गावगुंड बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी घर जाळून टाकण्याची व घर खाली करण्याची धमकी देण्यात आलेली होती. याबाबत तक्रार देखील केलेली आहे. घराला पेटवून देण्याची घटना घडलेली असताना नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून घेतली गेली नसल्याचे निवेदनात कोळी दांम्पत्यांनी म्हंटले आहे.
तर गट नंबर 1026 मधील आठ गुंठे जमीन विकण्यात आली. त्या सामाजिक कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर खाडाखोड करून 15.10 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावून घेतली.कोरोना काळात टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन राहते घर पाडून त्याला दगडी कंपाउंड केले. या जागेची शासकीय भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी झालेल्या जमिनीच्या खुना असलेल्या क्षेत्रातही बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे. याची विचारणा केली असता, तो सामाजिक कार्यकर्ता व गावगुंड शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणारा तो सामाजिक कार्यकर्ता व त्या गावगुंडांवर गुन्हा दाखल करुन न्याय मिळण्याची मागणी आयजी बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे करण्यात आली. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर देहत्याग करण्याचा इशारा देण्यात आला आहे.