चोंडीच्या जयंती कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आठवले येणार
आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे शुक्रवारी (दि.31 मे) होणाऱ्या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी व अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार आहे. या कार्यक्रमासाठी नगर दक्षिण मधून मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार आहेत.
ना. रामदास आठवले सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चोंडी येथे आगमन होणार आहे. यानंतर ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरपीआय पक्षाचे संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राज्यसचिव दीपक गायकवाड, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे आदी उपस्थित राहणार आहेत.
चोंडी येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या नान्नज (ता. जामखेड) येथील निवासस्थानी भेट देणार आहे. यानंतर ते करमळा मार्गे पंढरपूरला रवाना होणार आहेत. जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चोंडी येथे सकाळी 10 वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.