जगण्याने छळले; अनामप्रेम-स्नेहांकुर ने तारले

अहमदनगर
ही कथा आहे एका अबला मूकबधिर महिलेची. नूर (बदललेले नाव) ही तिच्या पालकांसोबत एका खेड्यात राहत होते. तिचे वडील हे एका खाजगी कंपनीत छोटे काम करतात. आई लहानपणी असतानाच वारली. मुलगी मूकबधिर असल्याने वडील अतिशय चिंतेत होते. नूर ला 6 बहिणी व 1 भाऊ असे मोठे कुटुंब. आई वारल्याने व नूर मोठी असल्याने घराच्या जेवणावळीची तिच्यावर जबाबदारी पडलेली.मूकबधिर असूनही थोड्या थोडक्या खुणांनी तिचा संवाद व्हायचा आणि दिवस निघायचा. एक एक करीत सर्व सामान्य बहिणींचे विवाह झाले. कुटूंब धार्मिक असल्याने सर्व शिस्तबद्ध पार पडले.धाकटा भाऊ शिकायला वडिलांनीबाहेर गावी पाठवला. नूर व तिचे वडील असे दोघेच त्या शहरा शेजारच्या खेड्यात राहू लागले.
काळ पुढे सरकत होता. भरलेले घर सर्व बहिणींच्या विवाहाने काही वर्षानी खाली खाली वाटू लागले. अधून मधून बहिणी तिचे यजमान घरी यायचे. सगळ्यांचा मान-पान नूर करायची.तिचे अगत्य पाहुन सगळे जण तिला नावाजायचे. गावात देखील तिला ओळखणारा वर्ग होता. वडील यांची उठबस बऱ्याच ठिकाणी असल्याने घरी चहा पान ,अधून मधून जेवण करण्यास मंडळी येत राहायची , नूर आपली राबण्यात व्यस्त रहायची.
अधून मधून ती दुस-यांच्या शेतात खुरपणी करायला जायची. तिला मिळालेल्या मजुरीतून आनंद व्हायचा. कधी कधी ती बाजार हाट करायची. उंचापुरी, घरकामात मुरब्बी नूर सगळं घर आईच्या नंतर हिकमितीने चालवायची. सगळं कसं सुस्थितीत चालले होते. एक दिवस काळाची नजर फिरली आणि अतिशय वाईट दिवस पुढ्यात आले. जगायचे की मरायचे..? हा प्रश्न नूर आणि तिच्या वडिलांसमोर आला.
कामानिमित्त वडील बाहेर गावी जायचे. कधी कधी मुक्कामी रहायचे. नूर घरीच असायची. एकटी असायची. गाव तस धड खेडे नाही आणि शहर नाही. शहरापासून तुटक पण शहराच्या चालीवर निघालेले. अधूनमधून वडील घरी नसतात व नूर एकटीच असते. ती मूकबधिर आहे.याची गावात माहिती होती. एका रात्री याचा फायदा घेत राबणाऱ्या नूर वर एका हरामी नराधमाने अतिप्रसंग केला. ती काहीच प्रतिकार करू शकली नाही. सवांद करता येत नसल्याने ती कोणाला हे सांगू शकली नाही.ती प्रचंड घाबरली. जीवाच्या आकांताने ती सैरभैर झाली. त्या नराधमाने कोणाशी काय संवाद करशील तर जीव घेईन..? अशी बतावणी केली असावी कारण ती पुढील काही महिने घराबाहेर उन्हात देखील आली नाही. सगळं जीवनच विस्कळीत झालं… चूक काही नसताना… केवळ बोलता येत नाही म्हणून….!!!
वडिलांच्या हे लक्षात आले की नूर वेगळी वागतेय, कोणत्याच खूणा करत नाही… एक दिवस रात्री ती पोट दुखते म्हणून लोळायला लागली.वडिलांनी ओवा, लिंबू पाणी, संडास व्हायच्या गोळ्या,काळा चहा असले घरगुती उपाय केले पण तिला आराम पडेना.. दुसरा दिवस उजाडला. वडील काळजीने खाजगी डॉक्टरकडे तिला घेऊन गेले. डॉक्टर यांचे डोळे व काय झालंय..? या प्रश्नाचे उत्तर एकून वडिलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..नूर तर फार घाबरली.वडिलांचा रागाने लालबुंद झालेला चेहरा व शारीरिक बदल यामुळे तिला पटकन मरण यावे असेच वाटू लागले.इकडे वडिलांना तोंड कोणाला दाखवू..? काय घडले माझ्या मुक्या लेकराच्या जीवनात..आई गेली आणि हिने गाडी सावरली.इतकी समजूतदार मुलगी पण फसली की कोणी तिच्याकर अतिप्रसंग केला… विचारांचे काहूर माजले.गरिबीने आणि परिस्थिती ने इतके फटके मारले की आता फटका खायला जागा आणि जीवात त्राण उरला नव्हता. तरीही परिस्थिती उखळात कुटतेय अशीच बाप लेकीची भावना झाली.डॉक्टर समजूतदार होते. हा प्रसंग त्यांनी शिताफीने हाताळला.या मूकबधिर नूर व तिच्या वडिलांना त्यांनी सिव्हिल रुग्णालयात पाठविले. सगळं गुपित राहील या विश्वासाने..
नूर व तिचे वडील सिव्हिल ला आले. तेथील डॉक्टर यांनी नूर 3 महिन्यांची गरोदर असल्याचा रिपोर्ट दिला. सगळं पाहून जीवन संपवावे असेच दोघांनी ठरवले. पहिले डॉक्टर व सिव्हिल चे डॉक्टर यांनी बाप लेकीला बंदिस्त खोलीत घेतले. स्नेहाकुर या प्रकल्पाची माहिती दिली. अब्रू नावाची अदृश्य शक्ती जगण्याची लक्तरे फाडत होती. काय करु..? कुठे जाऊ..? असा प्रश्न या नूर व तिच्या वडिलांना पडला. त्यांच्या गावावरून 300 km दूर ते स्नेहाकुर शोधत आले ,जगण्याचा मार्ग मोकळा होईल या एका आशेवर…!!
स्नेहाकुर प्रकल्पात आल्यावर नूर ही मूकबधिर आहे आणि तिला अनामप्रेम संस्थेत संवादातुन तिला मानसिक आधार द्यावा या हेतूने पाठवावे असा निर्णय स्नेहाकुर प्रकल्पाने घेतला. नूर ला व तिच्या वडिलांना वाटले अजून हे अनामप्रेम कुठेय..? स्नेहाकुर च्या वाहनाने ते जड पावलांनी थकल्या मनाने अनामप्रेम संस्थेच्या गांधी मैदानात आले.
कधीही न शिकलेली हातवाऱ्याची भाषा पाहुन नूर चमकली. संस्थेतील मूकबधिर प्रवर्गातील मुले-मुली पाहून तिला आधार वाटला.वडिलांना योग्य ठिकाणी आपण आलोत असे काही वेळ वाटले पण नूर चे पुढे काय होणार..? सगळं व्हायला नूर ला समजायला अजून 6 ते 7 महिन्यांचा कालावधी आहे.. काय होणार, कसं होणार ..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संस्थेतील डॉ.मेघना मराठे ,अभय रायकवाड, विक्रम प्रभू, उमेश पंडुरे व विष्णू वारकरी यांच्या संवादातून वडिलांना मिळाली. आधीच सगळी कडे रंग व धर्मावरून वाद सुरू असताना ज्याचा रोजची भाकरी हाच धर्म आणि जात असणा-याना या पोट भरलेल्या लोकांच्या द्वेषी भांडणाचा त्रास किती पटीने होतो हे या प्रसंगी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. वेदनेशी नाते हाच धर्म असणाऱ्या या संस्थेतील कार्यकर्ते यांनी नूरला संवाद, नजर व वागणूक यातूनमोठा आधार दिला. तिला 7 महिन्यासाठी दत्तक घेतले. अबला,संकटात सापडणाऱ्या दिव्यांग यांना आमची दारे सताड खुली असल्याचा स्वभाव नूर च्या वडिलांच्या लक्षात आला.
काळ पुढे पुढे जातो तसा 7 महिन्यांचा काळ गेला.अनामप्रेम च्या कार्यकर्ते यांनी नूर चे खाणे,विश्रांती सगळं सांभाळले.2 दिवसापूर्वी नूर चे बाळंतपण पार पडले.नूर ला व तिच्या पालकांना नकोसे असणारे बाळ सुरक्षित व कायदेशीर रित्या स्नेहाकुर ने ताब्यात घेतले. नूर चा व तिच्या बापाचा गळ्याचा फास मोकळा झाल्याचा अनुभव नूर च्या बालकाचा परित्याग पार पडल्यावर सर्व कार्यकर्ते यांना आला. सगळं गोपनीय झाल्याने आमचे मरण टळले असे नूर चे वडील हबरून हबरून रडून सांगत होते. गरिबाला अब्रू असते आम्ही तोंड कुठं दाखवणार व वहिम (संशय ) कोणावर घेणार ..? अस काही बाही वडील म्हणत होते…
आज दोघेही बाप लेक त्यांच्या घरी परतले… एक वाईट स्वप्न पडले ते पाहून ते आता झोपेतून जागे झाले अस काहीस त्यांचा चेहरा सांगत होता. नवा दिवस उगवला आणि हा अनुभव गाठीशी धरून नूर व तिचे वडील जगणार आहेत..विधी संघर्ष ग्रस्त दिव्यांग,अत्याचारित, अनौरस गरोदर होणाऱ्या,अत्याचारित दिव्यांग महिलाव मुली यांचा प्रश्न गंभीर आहे तो संस्थेच्या परीने सोडवायचा हे आता पक्के अनामप्रेम ने ठरवलंय.. अंधार फार आहे पण पणतीने आपली जागा उजाळायची हीच आपली जनुके आहेत नाही काय..? केवळ समाज सहयोगावर काम करणाऱ्या 300 शे दिव्यांग यांचे संगोपन करणाऱ्या अनामप्रेम ला शक्य ती मदत आपण जरूर करा..
मदत करण्यासाठी सम्पर्क-
9011020174,7350013801,9011670123,7350013806
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles