आज विसर्जनासोबत हे कोविड विघ्न गणरायाने सोबत न्यावे : अँड.शिवाजीराव काकडे
अमरापूर प्रतिनिधी – दि.(१९) रामनवमीच्या मुहूर्तावर सुरू झालेले हे कोविड उपचार केंद्र गेल्या सहा महिन्यापासून अविरतपणे रुग्णांच्या सेवेमध्ये सुरु आहे. यापुढेही या कोविड उपचार केंद्रामध्ये अखंडपणे रुग्णांची सेवा करण्याचा मानस येथील डॉक्टर व आरोग्य सेवकांचा आहे. श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही संबोधले जाते. आज गणरायाच्या विसर्जनासोबत हे कोविडचे विघ्न गणरायाने सोबत घेऊन जावे असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी आज अमरापूर येथे केले.
कॉ.आबासाहेब काकडे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सुरु केलेल्या जनशक्ती कोविड उपचार केंद्राचे नवीन जागेत स्थलांतर कार्यक्रम आज घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती अॅड.अर्जुनराव जाधव हे होते. यावेळी जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, डॉ. अरविंद पोटफोडे, माजी सरपंच सुरेश चौधरी, कॉ.राम पोटफोडे, नामदेव सुसे आदि प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे. डॉक्टरांवरील विश्वास हा परमेश्वरावरील विश्वासा इतकाच महत्त्वाचा आहे. येथील आरोग्यसेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. आज पर्यंत येथील आठ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
अॅड.अर्जुनराव जाधव अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कॉ.आबासाहेबांनी त्यांच्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम हाती घेतले. डॉ.टी.के.पूरनाळे यांनी देखील समाजकारण, राजकारण करत असताना शेवगाव तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारची रुग्णसेवा दिली. त्यांच्या या कार्याचा वारसा अॅड.शिवाजीराव काकडे व सौ.हर्षदा काकडे पुढे चालवत आहेत. भविष्यात तालुक्यातील जनतेसाठी रुग्णसेवा देण्यासाठी एखादा प्रकल्प उभारावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र पोटफोडे, शेषराव फलके, राजेंद्र फलके, बाळासाहेब पाटेकर, योगेश देशमुख, विष्णू दिवटे, लक्ष्मण वाणी, भारत भालेराव यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.
यावेळी स्वयंसेवक यांनी चांगली सेवा दिली याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईश्वर वाबळे प्रास्ताविक राजेंद्र पोटफोडे यांनी तर आभार संजय दुधाडे यांनी मानले.