जलसंपदा विभागाच्या खाजगीकरणास सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विरोध

0
85

वेळप्रसंगी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा

सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेकार पात्र उमेदवार भरण्याची मागणी

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

जलसंपदा विभागात आकृतिबंधाच्या नावाखाली पद संख्या कमी करून,उपलब्ध शासकीय कामे ठेकेदारांना देण्याचे काही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याने या खाजगीकरणास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे.तर वेळप्रसंगी संघटनेच्या माध्यमातून राज्यात प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने उपलब्ध रिक्त पदे अनुकंपा वरील प्रतीक्षा यादीतून तसेच सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेकार पात्र उमेदवार भरण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य शासनाचे सर्वच विभागात आस्थापनेचा आकृतिबंध यापूर्वीच लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रशासकीय कामासाठी आवश्यक ती पदे सर्वच खात्यांतर्गत विहित करण्यात आली आहेत.सध्या मंजूर असलेल्या पदांपैकी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने ती तातडीने भरणे आवश्यक आहे.कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे एकाहून अधिक पदांचा कार्यभार अतिरिक्त रित्या सोपविण्यात आलेला आहे.

यामुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, पर्यायाने जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी उपलब्ध कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालयीन वेळानंतर तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित कामाचा निपटारा करावा करावा लागत आहे.अशा परिस्थितीमध्ये पुनश्‍च सुधारित आकृतिबंधाच्या नावाखाली काही विभागाचे खाजगीकरण करण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण, उपलब्ध असलेल्या नोकर्‍यांच्या संधी या आधीच अत्यंत कमी झाल्या आहेत.त्यामुळे सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसें दिवस वाढत चालली आहे.अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.नवीन आकृतिबंधाच्या नावाखाली पद संख्या कमी करून, उपलब्ध शासकीय कामे ठेकेदारांना देण्याचे काही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्यास सदर कृतीस संघटनेच्या वतीने तीव्र विरोध राहणार आहे.

जलसंपदा खात्याअंतर्गत काही प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्याने अनेक मंडळ कार्यालय, विभागीय कार्यालये तसेच उपविभागीय कार्यालय बंद झाली आहे.त्यामुळे पदसंख्या मोठ्या प्रमाणात आपोआप कमी झाल्याने आकृतिबंध लावून कार्यान्वित असलेल्या कार्यालयातील पद संख्या कमी करून उपलब्ध कामे खासगी ठेकेदारांकडून करण्याचे नियोजित प्रस्तावास कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विरोध असून, सर्व कर्मचार्यांच्या सेवा सुरक्षित करण्याबाबत संघटना आग्रही राहणार असल्याचे म्हंटले आहे.

शासन स्तरावरून जलसंपदा तसे इतर विभागांतर्गत आकृतिबंधाचे नावाखाली पदसंख्या कमी करून कर्मचार्‍यांच्या सेवा धोक्यात आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने सरकारी कामाचे खाजगी करण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करून उपलब्ध रिक्त पदे अनुकंपा वरील प्रतीक्षा यादीतून तसेच सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेकार पात्र उमेदवार भरण्याची मागणी करण्यात आली आहे.तर ही पदे भरताना उपलब्ध असलेल्या मागासवर्गीय व अपंग कर्मचार्‍यांचा अनुशेष प्राधान्याने भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे सुचविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here