देशातील युवकांना सक्षम करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे कार्य दिशादर्शक – मेजर नारायणराव चिपाडे
नेहरु युवा केंद्र व जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ.च्या वतीने नेहरु युवा केंद्र स्थापना दिवस
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील युवकांना सक्षम करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे कार्य दिशादर्शक आहे. युवकांमध्ये नेतृत्व,संवाद कौशल्य,सामाजिक कार्यात सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून विविध योजना नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. अनेक युवक-युवतींना नेहरु युवा केंद्राच्या वतीने दिशा मिळाली आहे. युवा मंडळे, सामाजिक संस्था नेहरु युवा केंद्राच्या मार्गदर्शनाने भविष्यात सक्षम भारत घडविणार असल्याची आशा मेजर नारायणराव चिपाडे यांनी व्यक्त केली.
शहरातील बालिकाश्रम रोड, लेंडकर मळा येथील माळी सेवा संघाच्या कार्यालयात नेहरु युवा केंद्र व जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नेहरु युवा केंद्र स्थापना दिवस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि वीर लहुजी वस्ताद साळवे जयंती तसेच बाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर चिपाडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.भानुदास होले,आधारवडच्या अध्यक्षा अॅड.अनिता दिघे,जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.महेश शिंदे,जीवन आधारच्या अॅड.पुष्पा जेजुरकर, डॉ.अमोल बागुल,डॉ.संतोष गिर्हे,डॉ.धीरज ससाणे, नृत्यविशारद अनंत द्रविड, शाहीर कान्हू सुंबे, अॅड. संगीता पाटोळे, रजनी ताठे, रमेश चिपाडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अॅड.अनिता दिघे यांनी वीर लहुजी वस्ताद यांचे जीवन कार्य, शरीरसंपदा व देशभक्ती याबाबत माहिती दिली. तर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज, डच व इतर शत्रू विरुद्ध त्यांनी दाखवलेले शौर्य कथन करुन आजच्या युवकांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भानुदास होले यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व कौशल्य, दूरदृष्टी यामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणणे वावगे ठरणार नाही. आराम हराम है! या बोधवाक्यप्रमाणे ते अविरतपणे कार्यरत राहिले. पंडित नेहरू उच्चशिक्षित पहिले पंतप्रधान म्हणून भारताला लाभल्याने देशाची प्रगतीकडे वाटचाल झाली.पंडित नेहरू यांचे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्तिमत्त्व युवापिढी समोर आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.अमोल बागुल यांनी अहमदनगर व पंडित नेहरू यांचे जवळचे नाते असून, भुईकोट किल्ल्यात बंदिवान असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाची निर्मिती केल्याचे सांगितले.यावेळी लहान मुलांना पंडित नेहरु यांच्या जीवनावरील पुस्तके व गुलाबपुष्प देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.अनिता दिघे यांनी केले. आभार अॅड. पुष्पा जेजुरकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी रयतचे पोपट बनकर, जय युवाचे अॅड. महेश शिंदे, उत्कर्षाच्या नयना बनकर, वैशाली कुलकर्णी, सुभाष जेजुरकर, अशोक भिंगारदिवे, शरद वाघमारे, रजनी ताठे, मंदा सुपेकर, आरती शिंदे, अॅड. संगीता पाडळे, धीरज ससाणे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, कर्मचारी रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.