कोरोना काळात फिनिक्स फाऊंडेशनचे सर्वसामान्यांना आधार
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनने घेतलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेकांवर मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जागतिक दृष्टी दिननिमित्त अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ते घरी परतले असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
कोरोनाच्या भितीने माणुस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाऊंडेशनने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार दिला. फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेकांवर मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कोरोनाने सर्वसामान्यांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला होता. मोठ-मोठे हॉस्पिटल सेवा देत असताना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाणे देखील शक्य नव्हते.अशा परिस्थितीमध्ये फिनिक्स फाऊंडेशनने मोफत शिबीर राबविले. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो.या वर्षी १४ ऑक्टोबरला हा योग आला आहे.सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, वेगवेगळे नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येत असल्याचे बोरुडे यांनी स्पष्ट केले.
मनुष्याच्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळा.जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात केवळ अंधार आणि अंधारचं असतो. डोळ्याला कमी दृषी आहे हेच लक्षात येत नाही.त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्याने तो आजार बळावतो.वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा व्यक्तींच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे.
ज्येष्ठ व्यक्तींना वेळेत उपचार घेता यावे या दृष्टीने फाऊंडेशन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याने नेत्रदान चळवळीत कार्य सुरु आहे. तर अवयवदानसाठी देखील फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.