जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड -कलाकेंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला कोणतेही कारण नसताना दोघांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगड फेकून मारला व लोखंडी रॉडने मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व गंभीर जखमी केले अशी फिर्याद दाखल झाली यावरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुरूवातीला पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी जामखेड पोलीस जागे झाले व सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीच्या घटनेमुळे जामखेड मधील कलाकेंद्र पुन्हा चर्चेत आले आहे.
याबाबत जामखेड पोलीसात फिर्यादी उजेफ रफीक शेख रा. सदाफुले वस्ती जामखेड यांनी फिर्याद दिली की, दि. २६ रोजी रात्री अकरा वाजता जामखेड शहराच्या उत्तरेस दोन कि.मी. अंतरावर असलेल्या स्वराज कलाकेंद्रावर गेलो असता तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर व सोनु वाघमारे यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
आरोपी सोनु वाघमारे याने फिर्यादी उजेफ शेख यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या दिशेने दगड फेकून मारला व दुसरा आरोपी विक्रम डाडर याने लोखंडी रॉड या हत्याराने मानेवर वार केला व दोघांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस खड्ड्यात फेकून गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत झाले अशी फिर्याद उजेफ शेख याने दाखल केली. पोलिसांनी भादवी कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड व मोहा हद्दीत असलेले कलाकेंद्रात सातत्याने मारहाणीच्या घटना घडत असून कलाकेंद्र रात्रभर चालू राहतात जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने राज्यभरातील गुंड कलाकेंद्रावर येत असतात व मारहाणीच्या घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत.