रिपाईचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन;
जाहिरात लावणार्या युवकाच्या मृत्य प्रकरणी संबंधित ठेकेदार व महापालिकेवर जबाबदारी निश्चित करावी
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील लोखंडी कमानीवर जाहिरात लावताना युवकाला वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधीत जाहिरात ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना देण्यात आले.
यावेळी रिपाईचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, आजिम खान, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, अभिजीत भगत, गणेश पोटे, बिरजू जाधव, शुभम धुमाळ आदी उपस्थित होते.
शहरात सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर जाहिरात (फ्लेक्स) लावताना सौरभ चौरे (वय 22 वर्षे) याला कमानी जवळ असलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन वीजेचा धक्का बसला. यामध्ये तो खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला.
महापालिकेने पुणे येथील एका संस्थेला दहा वर्षाच्या करारावर शहरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक असलेल्या कमानीवर जाहिरात करण्यासंबंधी बीओटी तत्त्वावर ठेका दिला आहे.या प्रकरणात युवकाच्या मृत्यूस संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन जबाबदार आहे.
लोखंडी कमानीच्या शेजारी विद्युत तारा असताना कमानीला परवानगी कशी देण्यात आली. या हलगर्जीपणामुळे एका युवकाला जीव गमवावा लागला आहे.
महापालिका व ठेकेदार या प्रकरणातून आपले अंग काढून घेत आहे.मयत युवकाच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, या प्रकरणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.मयत युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जाहिरात ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अन्यथा सात दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालया येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.