शासनाच्या योजना कलाकारांपर्यंत पोहचवाव्यात -संभाजी कदम
अहमदनगर प्रतिनिधी – कलाकार हा आपल्या कलेतून समाजातील भावना व्यक्त करत असतात. एखादी कलाकृतीतून जो संदेश मिळतो तो सदैव प्रेरणादायी असतो. कलाक्षेत्रातील आपल्या कौशल्याने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्या कलाकारांचा शासन त्यांना मानधन देऊन सन्मान करत असते. समितीच्या माध्यमातून कलाकारांची निवड करुन त्यांना योग्य ते मानधन मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
शासनाने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्यांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम या पदाच्या माध्यमातून रितेश साळूंके यांनी करावे. एका हरहुन्नरी कलाकारांची निवड झाल्याने कलाकारांना न्याय देण्याचे काम ते करतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांच्या मानधन देणार्या जिल्हास्तरीय समितीवर रितेश साळूंके यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संतोष तनपुरे, दत्ता जाधव, अण्णा घोलप, सागर थोरात, भारत बेंद्रे, विष्णू थोरात, अभि दहिंडे, गणेश दहिंडे आदि उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना रितेश साळूंके म्हणाले, कलाकाराचे आपल्या कलेवर नितांत प्रेम असते. यात तो स्वत: पुर्णत: गुंतवून घेत असतो. रसिकांची दाद ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी पावती असते. परंतु हे करत असतांना त्यांच्या कलेची शासकीय पातळीवर दखल घ्यावी, अशी अपेक्षा असते. आपली या समितीवर निवड झाली त्यात मित्र परिवारांच्या सदिच्छा आहेत. या पदाच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.
याप्रसंगी संतोष तनपुरे यांनी रितेश साळूंके यांच्या कार्याची माहिती दिली. शेवटी अण्णा घोलप यांनी आभार मानले.