‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वाराई’ च्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची व्यापारी शिष्टमंडळाने भेट घेऊन बाजारपेठेतील प्रचलित पद्धत चालू ठेवावी व पोलीस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर दाखल होत असलेले गुन्हा बाबत चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सांगितले की,वाराईच्या प्रश्नासंदर्भात जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तो पर्यंत प्रचलित पद्धत चालू ठेवण्याची ग्वाही दिली व व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाही असे आश्वासन व्यापारी शिष्टमंडळास दिले.
यावेळी संतोष सूर्यवंशी,मारुती रेपाळे,मा.नगरसेवक निखिल वारे,पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड,बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, सुरेश बाफना,बापूसाहेब गवळी,सुदाम तागड,बबन बेल्हेकर, नंदकुमार शिखरे,पारस लोढा,अभिजीत बोरुडे,विकी वाघ तसेच यावेळी विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध संघटनेच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ ही मागणी घेऊन ट्रान्सपोर्ट संघटना गेली काही दिवसांपासून बाजारपेठेतील वातावरण दूषित करून वातावरण बिघडवत आहेत. कोणत्याही मालाची वाहतूक करतांना त्याचे मोटार भाडे,ट्रान्सपोर्ट वाले व मोटार मालक हे एकूण अंतर,डिझेल खर्च,वाराई रक्कम,टोलनाके,काटा पावती गृहीत धरून ठरवितात गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत संपूर्ण देशात व सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठी प्रचलित आहे.
परंतु माथाडी मंडळाच्या शासनाने दिलेल्या एका कृती आराखड्याचा चुकीचा अर्थ लावून ट्रान्सपोर्ट संघटना बाजारपेठेत अशांतता निर्माण करीत आहेत तसेच सदरचा कृती आदेश हा फक्त माथाडी मंडळाने 2016 साली काढलेला आहे.सदर कृती आदेश हा माथाडी मंडळात अनिष्ट प्रथा मुंबई अधयोदिक परिसरात घडत होत्या, त्याला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आदेश काढला आहे. या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ट्रान्सपोर्ट वाले बाजारपेठेत अशांतता निर्माण करत आहेत तरी याला पायबंद घालण्याची मागणी या व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली.