जिल्ह्यात डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली
लोकभज्ञाक चळवळीचा दावा
विधानसभा निवडणुकीत विखे पराभव पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी चळवळ प्रयत्नशील
अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकभज्ञाक चळवळीने सुरु केलेली डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदारांनी लोकभक्ती, लोकांचे प्रश्न सोडविण्याची असलेली आस्था व लोकांसाठी निष्काम कार्य करणाऱ्या उमेदवाराला निवडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पराभव पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळ प्रयत्नशील राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेचे केंद्रीकरण करून आणि इतरांना फक्त वापरून घेण्याची प्रवृत्ती विखे कुटुंबाने अनेक दशके चालू ठेवली. निळवंडेच्या पाण्यापासून वीस ते पंचवीस वर्षे दुष्काळी पट्ट्यातील जनतेला वंचित ठेवले आणि फक्त प्रवरेच्या 40 गावांसाठी डुबक पध्दतीची शेती केली. हजारो लोकांना कामापुरते वापरून काम झाल्यानंतर फेकून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरदेखील सुज्ञ आणि काम करणाऱ्या लोकांना सत्ता आणि कायदा राबवण्याची संधी मिळणार नाही याची काळजी विखे कुटुंबाने घेतली. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेखाली घरकुलवंचित लोकांना 35 लाखाचे घर फक्त 7 लाखात मिळण्याची शक्यता असताना राधाकृष्ण विखे गृहनिर्माण मंत्री असताना या मागणीला कवडीची किंमत दिली नाही. त्यांचे चिरंजीव खासदार असताना घरकुल वंचितांबद्दल एक शब्द देखील त्यांनी काढला नाही. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दहा वर्षे आंदोलन चालवून अशा राज्यकर्त्यांना धडा शिकवला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
जिल्हा सत्तापेंढारी आणि घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडला याचा आनंद सामान्य नागरिकांना झाला आहे. लोकशाहीमध्ये कंड जिरविण्याची भाषा लोकांनी सपशेल नाकारली. लोकभक्ती, लोकांच्या प्रश्नाबद्दलचे सम्यक ज्ञान, लोकांचे प्रश्न सोडविण्याचे तंत्र, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निष्काम कार्य करण्याची प्रवृत्ती विखे परिवारात दिसली नाही. सत्ता आणि मंत्रीपदे मिळविण्यासाठी नितीमत्ता सोडून अनेक पक्ष विखे कुटूंबाने बदलले. पैशाने मतं विकत घेता येतात आणि जातीचा वापर करता येतो या तत्वावर उभे असलेले साम्राज्य पुर्णपणे नष्ट झालेले आहे. विखे कुटुंबाच्या पराभवामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला लोकप्रतिनिधी होता येईल, अशी आशा निर्माण झाली असल्याचे लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदींनी परिश्रम घेतले.