ज्यांनी खरी चळवळ केली त्यांचे संसार उघडे पडले -भन्ते राहुल
शहराच्या धम्म परिषदेत एकवटला जिल्ह्यातील बौध्द समाज
श्रामणेर विधीकर्ता शिबिराचा समारोप
अहमदनगर (प्रतिनिधी) – ज्यांनी खरी चळवळ केली, त्यांचे संसार उघडे पडले. ज्यांनी चळवळीचे ढोंग केले त्यांचे घर भरले..! चळवळीला त्याग बलिदानाची गरज असते. घरात सडून मेल्यापेक्षा धर्मांध व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचे आवाहन भन्ते शाक्यपुत्र राहुल यांनी केले.
अहमदनगर जिल्हा भिक्खू संघ, तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दहा दिवसीय निशुल्क श्रामणेर विधीकर्ता शिबिराचा समारोप व जिल्हास्तरीय पहिली भूमिपुत्र धम्म परिषदेत मार्गदर्शन करताना भन्ते राहुल बोलत होते. यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. विलास खरात, भन्ते सचितबोधी, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, संस्थेचे कायदे सल्लागार ॲड. संतोष गायकवाड, शिवाजी भोसले, दिपक अमृत, रंगनाथ माळवे, बाळासाहेब कांबळे, विशाल कांबळे, श्रीकांत देठे, अण्णा गायकवाड, विजितकुमार ठोंबे, मिंलिद आंग्रे, प्रकाश कांबळे, संतोष गायकवाड, सुनिल पंडित, प्रविण साळवे, मेहेर भिंगारदिवे, प्रमोद शिंदे, अकाश परदेशी, बाळासाहेब धीवर, गौतम पगारे, शांताराम रनशुर, विजय खंडीजोड, बीपीन गायकवाड, दिपक साठे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, संध्या मेढे, मायाताई जाधव, गौतमी भिंगारदिवे, आरती बडेकर, पद्मा कांबळे, आशा परदेशी, इंदुबाई कोरे, मंदा शिंदे, सत्यभामा साळवे, डॉ. भास्कर रननवरे, रमेश पगारे, रामदास धिवर, संजय शिंदे, सुहास सोनवणे, नाथा भिंगारदिवे, दिपक पाटोळे, रविंद्र कांबळे, संजय भिंगारदिवे, हिरालाल भिंगारदिवे, शांताराम बनसोडे, डॉ. विश्वास गायकवाड, करण पाचरणे, गोरख केदारे, अशोक बागुल आदींसह उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे भन्ते राहुल म्हणाले की, भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग, बलिदानातून परिवर्तन घडले. त्यांनी दीन-दुबळ्यांचा उध्दार केला. मात्र समाजासाठी संघर्ष करत असताना त्यांच्या 4 मुलांना वेळेवर अन्न, औषध न मिळाल्यामुळे मरण पत्कारावे लागले. आई रमाई व डॉ. बाबासाहेब यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या हक्क, अधिकारामुळे आपण सुखाचे दिवस अनुभवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर गटातट व जातीयवादामुळे अहमदनगर जिल्ह्यात चळवळ चालविणे कठिण आहे. श्रमन संस्कार दिल्याने चळवळ भक्कम होते. जो पर्यंत बुद्ध विहार निर्माण होत नाही, तोपर्यंत बौध्द निर्माण होत नाही. जिल्ह्यात बौद्ध समाज असून देखील एकही बुद्ध विहार नसल्याची खंत व्यक्त करुन बुध्द विहार निर्मांणासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले.
भन्ते सचितबोधी म्हणाले की, 2021 पासून दरवर्षी उन्हाळी श्रामनेर शिबिर घेण्यात आले. श्रामनेर संस्कृती जपल्याने पुढे जाऊन देशाची प्रगती होणार आहे. समाजामध्ये जेव्हा मतभेद होतात, तेव्हा धम्माची अधोगती होते. म्हणून धम्मकार्यात दुसऱ्यांची चुक काढण्यापेक्षा त्यामध्ये स्वतः उतरून मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या संघटना करणे सोडून समाजाने एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रा. डॉ. विलास खरात म्हणाले की, बौद्धांनी चिकित्सक पद्धतीने नजर ठेवली पाहिजे. समीक्षा करुन वाटचाळ केल्यास चळवळ यशस्वी ठरणार आहे. महापुरुषांचे भक्त म्हणून नव्हे तर अनुयायी म्हणून जगल्यास जीवनाला दिशा मिळून समाजाचे कल्याण होणार आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील मनाचे श्लोक, भगवद्गीताचा समावेश केला जात असून, ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. मनुस्मृती पुढे करुन संविधानावर घाव टाकला जात आहे. या विरोधात लढा देण्यासाठी संघटन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय कांबळे म्हणाले की, तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून शहरात चार श्रामणेर शिबिर घेण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींचे लग्न लावण्याचे काम केले जात आहे. लोकवर्गणीतून धम्म रथ तयार केला असून, बुध्द रुप तयार करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये बुध्द रुप देण्याचा संकल्प आहे. जिल्ह्यात धम्म गतीमान करण्यासाठी प्रत्येक वर्षी धम्म परिषद घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.