कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेचा कर्जत तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष शब्बीर भाई पठाण उपाध्यक्ष किसन शिंदे व सचिव सय्यद भाई काटेवाले यांनी केले.
या मोर्चामध्ये जनाबाई कचरे, हिरालाल कोकाटे ,दामू बांदल ,विमल पवार, फुलनबाई ननवरे, जनाबाई कचरे ,राजू शेख, इम्तियाज शेख, राजेंद्र पठाण, बबन भैलुमे, जगन्नाथ होले, हसमतबेन शेख, नवनाथ साबळे, सुभाष पवार, सुभाष निंबाळकर, उमेश तापकीर, राहुल शिंदे यांच्यासह चारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सर्व मागण्या तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन मोर्चातील सर्व नागरिकांना यावेळी दिले.
आंदोलकांच्या वतीने बोलताना यावेळी शब्बीर भाई पठाण म्हणाले की शिधापत्रिका मिळण्यासाठी शासनाने विविध जाचक अटी लावलेल्या आहेत,याचा त्रास सर्वसामान्य व गोरगरीब वृद्ध नागरिक महिला यांना होत आहे.तरी तातडीने या जाचक अटी रद्द कराव्यात.तसेच संजय गांधी योजनेची मीटिंग मागील तीन महिन्यांपासून घेण्यात आली नाही, तसेच १७ जून या दिवशी झालेल्या मीटिंगमध्ये ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, त्यांना अद्यापही मानधन मिळालेले नाही.
यामुळे एक प्रकारे या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.तरीही सर्व प्रकरणे मंजूर करून त्यांना मानधन देण्यात यावे व या योजनेच्या मीटिंग दर तीन महिन्याला नियमित घेण्यात याव्यात अशी मागणी श्री पठाण यांनी केली.
तसेच कर्जत नगरपंचायत अस्तित्वात येऊन पाच वर्ष होऊन गेली तरी देखील समाज कल्याण विभागाचा अधिकारी कर्मचारी व टेबल अद्याप या ठिकाणी अस्तित्वात नाही.यावरून या संस्थेचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हे लक्षात येते अशी टीका करून श्री पठाण यांनी नगरपंचायतीने समाज कल्याण विभागाचा अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी ठेवून स्वतंत्र टेबल तातडीने निर्माण करून नागरिकांची कामे करावीत अशी मागणी यावेळी केली.
यावेळी बोलताना संघटनेचे उपाध्यक्ष किसन शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे तरी ती तातडीने मंजूर करण्यात यावी याच प्रमाणे ऑनलाइन पद्धतीमुळे शिधापत्रिका ऑनलाईन झाल्या आहेत मात्र त्याचा फटका गोरगरीब नागरिकांना बसत असून दोन रुपये तीन रुपये प्रमाणे धान्य गोरगरीब नागरिकांना या मुळे मिळत नाही तरी याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्या गरीब नागरिकांना धान्य देण्याची व्यवस्था करावी.
यावेळी बोलताना सय्यद भाई काटेवाले म्हणाले की मागील काही दिवसांपासून शंभर रुपयांचा स्टॅम्प नागरिकांना मिळत नाही तरी तो देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी.तसेच पारनेर सैनिक बँकेतील लाभार्थ्यांचे मानधन बंद झालेले आहे तरी ते त्वरित सुरू करण्यात यावेत याचप्रमाणे गोरगरीब नागरिकांना करणामुळे आर्थिक अडचण असून त्यांना दर महिन्याला मानधन देण्याची व्यवस्था करावी.याचप्रमाणे वाढलेली महागाई होणारा खर्च पाहता गोरगरीब नागरिकांचे मानधन आता एक हजार रुपये भरून दोन हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी श्री काटेवाले यांनी केली.
मोर्चा तहसील कार्यालय वर गेल्यानंतर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून आपल्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील व सर्व प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.