डॉ. ऋतुजा सोनकर यांना पीएचडी प्रदान
विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमीने केला गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी) – ऋतुजा मुरलीधर सोनकर यांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी (एसीएसआयआर) च्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
चांदा (ता. नेवासा) येथील असलेल्या ऋतुजा सोनकर यांनी संशोधन कार्य सीएसआयआर (सीएसआयआर) अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीएफटीआरआय) म्हैसूर येथे पूर्ण झाले आहे. त्यांचा पीएचडी संशोधनाचा विषय गव्हाच्या कोंडापासून सायलॉजिकोसॅकेराईड निर्मितीसाठी हिरवी प्रक्रिया आणि त्याची प्रीबायोटीक क्षमता हा होता. हे कार्य डॉ. प्रवीणा बी. मुदलियार (वरिष्ठ प्राचार्य संशोधक ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
डॉ. सोनकर यांनी डीबीटी-जेआरएफ (2017) परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून पीएचडी साठी शिष्यवृत्ती मिळवली होती. वडिलांच्या पश्च्यात कठीण परिस्थितीत त्यांच्या मातोश्री हिराबाई सोनकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुलीने केलेल्या कार्याने आईचा उर भरून आला. हिराबाई सोनकर यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने डॉ. ऋतुजाने यश संपादन केल्याचे सांगितले.
दरम्यान डॉ. सोनकर अगोदर इंजीनियरी स्नातक अभिरुचि परीक्षा (गेट 2018) मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण आहेत. वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषदेद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (सीएसआयआर नीट) परीक्षेमध्ये देशातून 51 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण आहेत. त्याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अधिव्याख्याता पदासाठी घेतलेल्या 2017 च्या सेट (एमएच सेट) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. डॉ सोनकर यांचे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले असून जैवतंत्रज्ञान या विषयामध्ये एम.एसस्सी हा पदयुत्तर शिक्षणक्रम पूर्ण केला आहे. डॉ. सोनकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.