अहमदनगर प्रतिनिधी – स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व मराठा महासंघ नगर तालुका यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट दंत तज्ञ’ पुरस्कार गोरे डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुदर्शन गोरे यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जि.प. सदस्य माधवराव लामखडे, संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, अभिनेते मोहनीराज गटणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. नानासाहेब डोंगरे, सचिव मंदा डोंगरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आ.निलेश लंके म्हणाले, आपण आपली नोकरी, व्यवसाय करत असताना सामाजिक जाणिव ठेवली पाहिजे. समाजातील गरजूंना मदत करुन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम करावे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे मोठे संकट आपणा सर्वांवर आले आहे. या काळात सर्वांनीच गरजूंना मदत करुन मोठे पुण्याचे काम केले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन डोंगरे प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार रुपी जो सन्मान केला आहे, तो त्यांना प्रोत्साहन देणारा असाच आहे, असे सांगून सर्वांचे अभिनंदन केले.
गोरे डेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ सुदर्शन गोरे यांनी मागील अकरा वर्षापासून हजारपेक्षा जास्त कृत्रिम रोपण दंत शस्त्रक्रिया तसेच दोन हजार पेक्षा जास्त रूट कॅनल शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत.
या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीचे जाण ठेवून गोरे डेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून नगर शहर तालुका व जिल्हा परिसरात २०० पेक्षा जास्त मोफत दंतरोग तपासणी शिबिराचा आयोजन केले आहे.
या शिबीराचा लाभ दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांनी घेतलेला आहे.त्यांच्या कामाची पावती म्हणून डॉ. सुदर्शन गोरे यांना सर्वोत्कृष्ट तज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला.