जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक – उद्योजक सागर भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगावच्या ज्ञानसाधना गुरुकुल मधील इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना युवा उद्योजक सागर भालसिंग यांच्या वतीने अभ्यासासाठी टॅबचे वाटप करण्यात आले. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या उद्योजक भालसिंग यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला.
प्रास्ताविकात ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे म्हणाले की, सागर भालसिंग हे शेतकरी कुटुंबातून आलेले वाळकी गावचे सुपुत्र आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांनी नऊवी मधूनच शाळा सोडली. जवळपास चार वर्ष एका सुपर मार्केट मध्ये काम केले. काम करताना इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा बाहेरुन देऊन ते उत्तीर्ण झाले. मोबाईल विषयी आवड निर्माण होऊन त्यांनी 2011 साली अवघ्या चार हजार रुपयात एक छोटासा मोबाईल व्यवसाय सुरु केला. अतिशय संकटे आली, जीवनात चढ उतार आले पण जिद्दीने एका छोट्या टपरीपासून सुरु झालेला व्यवसाय एका मोठ्या शॉप पर्यंत जाऊन पोहचला आहे. मनात जर कष्ट करण्याची ताकद व जिद्द असेल तर माणूस यशस्वी होतो, हे त्यांच्या जीवनप्रवासावरुन स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सागर भालसिंग म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाने चांगले शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण कमी असल्यामुळे वेळोवेळी व्यवसाय करताना अडचणी येतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे मुलांनी मधूनच शिक्षण सोडून न देता, उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर शिक्षणासाठी अडचण आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले की, भालसिंग यांच्या जीवन प्रवासातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांची पूर्ण पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व येणाऱ्या काळात विद्यार्थी सुद्धा चांगले शिक्षण घेऊन आपले ध्येय गाठतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी छबुराव कोतकर, राकेश गाढवे, प्रा. शाहरुख शेख आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.