दादा चौधरी विद्यालयात जागतिक मल्लखांब दिवस साजरा
पोल मल्लखांबाचे पूजन
मल्लखांबाने सदृढ शरीर व मन घडते -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दादा चौधरी विद्यालयात आठवा जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोल मल्लखांबाचे पूजन जिल्हा सिलंबन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी भाई सथ्था नाईट हायस्कुलचे प्राचार्य सुनिल सुसरे, प्रशिक्षक गणेश वाळुंजकर, शरद पवार, कैलास करांडे, मंगेश भुते, प्रशांत शिंदे, पुष्कर सराफ, प्राजक्ता साठे, अश्विनी वाळुंजकर, ज्योती विद्ये आदींसह खेळाडू उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, मल्लखांबाने सदृढ शरीर व मन घडते. जीवनात उत्साह टिकून राहतो. शारीरिक व्यायामासाठी मल्लखांब सर्वोत्तम क्रीडा प्रकार आहे. प्राचीन काळापासून या खेळाला परंपरा आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी मल्लखांब खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्राचार्य सुनिल सुसरे म्हणाले की, मराठी संस्कृतीतला खेळ असलेला मल्लखांबचे वर्ग क्रीडा संकुलमध्ये होत असल्याचा अभिमान वाटत आहे. सदृढ आरोग्यासाठी युवकांना मैदानाकडे चला, सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. मैदाने रिकामी होत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहे. निरोगी व सदृढ आरोग्यासाठी मैदानाकडे वळाल्यास सशक्त समाज निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश वाळुंजकर यांनी खेळातून पुढे आलेल्या युवकाची शारीरिक सदृढता व आरोग्य संपत्ती चांगली राहते. मल्लखांबातील खेळाडू शहराची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची आशा व्यक्त केली.