अहमदनगर प्रतिनिधी – वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा मुख्य उत्सव दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.आश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो असे प्रतिपादन डॉ सुधा कांकरिया यांनी केले
दिवाळीचा पहिला दिवशी नगर मधील एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये गो बारस निम्मित गाय गोर्यांचे पूजन डॉ सुधा व प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मान्यवर व साईबन चे कर्मचारी उपस्थित होते
डॉ कांकरिया म्हणाल्या अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो,असे मानले जाते.समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या.त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी होय
या दिवशी सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात-तत:सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते|, मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि|| म्हणजे हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते,तू माझे मनोरथ सफल कर,असा याचा अर्थ आहे.या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात.
घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे.घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात.ज्यांच्या घरी गुरे,वारसे आहेत,त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो.मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे.तिला माताही म्हणतात.ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा,असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या,आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या,शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात.
ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण,संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते,त्या ठिकाणी ती व्यक्ती,तो समाज,ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही,असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.