देवगावात रक्षाबंधन बीजबंधन म्हणून साजरे .

0
92

अकोले प्रतिनिधी –सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया . भाऊ आणि बहिण यांच्यातील पवित्र नात्याचा वर्षातील पहिला सण म्हणजे रक्षाबंधन , रक्षाबंधनासाठी बहिण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी व राखी बांधण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. भावा-बहिणीचे प्रेम आणि ऋणानुबंध घट्ट करणारा हा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो .या सणाचे औचित्य साधून आदिवासी भागातील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे जन्मगाव असलेले देवगाव येथील श्री देवराम भांगरे व ममताबाई भांगरे यांची कन्या आरती हिने आपल्या जिवलग भाऊ चिरंजीव प्रसाद याच्यासाठी जगावेगळी राखी बनवली असून रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी अंगणात भव्य अशी बियाण्यांपासून तयार केलेली रांगोळी साकारली आहे.

विविध रंगछटा आणि आकारातील बियांचा अतिशय कुशलतेने वापर करून ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हातामध्ये बांधण्यासाठी तयार करण्यात आलेली राखी ही सुद्धा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून व पारंपारिक बियाण्यांचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. ही कला कुमारी आरती हिला तिच्या आईकडून म्हणजेच जगप्रसिद्ध असलेल्या अन्नमाता श्रीमती ममताबाई देवराम भांगरे यांच्याकडून मिळालेली आहे. रात्री उशिरापर्यंत जागून भव्य रांगोळी आपल्या घरासमोर आरती हीने साकारली आहे. आपल्या भावाला आगळीवेगळी भेट देण्यासाठी तिने कठोर परिश्रम घेत एक वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला आहे.

आपल्या वाडवडिलांकडून आदर्श घेत पुढचीही पिढी पारंपारिक बियाणे व शेती यांच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे हे उदाहरण आहे . परिसरातील महिला आणि ग्रामस्थ ही रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here