धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाची नौटंकी करू नये :विश्वनाथ कोरडे
पारनेर प्रतिनिधी : जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी चांगलाच समाचार घेतला. धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. निलेश लंके यांनी सुपा एमआयडीसीत किती कंपन्या आणल्या सांगावे अथवा त्यांच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करतो असे सरळ आव्हान लंके दिले आहे.
विरोधकांनी मागील आठवड्या विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यावर आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे पुढे आले असून त्यांनी लंकेंना खडेबोल सुनावले. लंके यांनी रोजगारासाठी कोणतेही कामे केली नसून उलट सुपा एमआयडीसीतून खंडणी आणि हप्ते गोळा करण्याचे काम केले. संरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या माणसांच्या मार्फत धमकावून त्यांना वेठीस धरून केवळ आपला आर्थिक फायदा करून घेतला. त्यांच्या माणसांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो. कंपनीच्या मालकांकडे बसून जबरदस्ती भंगारचे ठेके, लेबर कॉंट्रक्ट मिळविण्याची कामे त्यांनी केली आहेत. वसाहतीत राहणाऱ्या लोकांना पाव सप्लाय करण्यांना कोणी त्रास दिला हे सुद्धा जनतेला माहीत आहे.यामुळे लंके यांनी सुजय विखे यांच्यावर आरोप करताना विचार करावा. लंके यांचे कारणामे लोकांसमोर आले तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही, असा घणाघात कोरडे यांनी केला. त्यांच्या जाचामुळे अनेक कंपन्या सोडून गेल्या. त्याचे उदाहरण म्हणजे तोशीबा कंपनी, कंपनीने पत्राव्दारे कंपनी हलविण्याचा निर्णय जाहीर केला होता.
विश्वनाथ कोरडे म्हणाले की, लंके यांनी सुपा एमआयडीसीचा इतिहात पहावा. खासदार सुजय विखे आणि पालमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत एकूण १ हजार ८८० कोटींच्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले. पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी नुकतेच महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना या एमआयडीसीत आणले. याची माहिती लंके यांनी घ्यावी. लंकेनी कोणत्या कंपनी आणण्यासाठी कुणाला भेट दिली यांची माहिती सांगावी. विखे यांच्या प्रयत्नातून सुपा जापनिझम मध्ये १३ जापनीज कंपन्यांचे काम सुरू केले आहे. तर अंबर, मायडिया, मिंडा, एक्साईड, मिस्तुबुशी, वरूण ब्रेवरेज, बीएमआर, क्लोराईड मेटल्स, अथर्व फार्मा,बोक्सोविया, अशा विविध कंपन्यांच्या मार्फत हजारो तरुणांना काम दिले आहे. तर लंके यांनी केवळ हप्तेखोरी करत सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना त्रास देण्याचे काम केले. यामुळे विखेंच्या विकासकामापुढे लंके ठेंगणे असून त्यांनी आपली पात्रता तपासून पाहवी असे कोरडे यांनी सांगितले. सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याने लंके यांचे धाबे दणाणले आहेत. पराभवाच्या भितीने ते वायफळ बडबड करत असल्याचा आरोप कोरडे यांनी केला.