अटी शर्तींचा भंग केल्याने लिलावात घेतलेल्या दूध संघाच्या जागेवर हाजी हमीद तकीया ट्रस्टने केला दावा : साई मिडास कडून विश्वस्तांना त्रास
धार्मिक भावना भडकावत असल्याची ट्रस्ट ची पोलिसात तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी) : साई मिडास रियॅलिटीज ने लिलावात घेतलेली दूध संघाची जागा सय्यद हाजी हमीद तकीया ट्रस्टशी झालेल्या करारातील अटी शर्तीचा भंग करून घेतलेली आहे. त्यामुळे या जागेवर ट्रस्टने पुन्हा आपला हक्क सांगत दावा केला आहे. त्यामुळे साई मिडास कडून ट्रस्ट च्या विश्वस्तांना वेगवेगळ्या मार्गानी त्रास देण्यात येत आहे. या द्वारे धार्मिक भावना भडकावून शांतता भंग करण्याचा प्रकार घडत असल्याची तक्रार ट्रस्ट च्या विश्वस्तांनी पोलिसात केली आहे.
ट्रस्ट चे अध्यक्ष सय्यद साबीर अली, विश्वस्त सय्यद मेहबूब अली, सय्यद निसार अली, आणि सय्यद जाहीद अली, पुजारी सय्यद गालिब अली, आणि इतर विश्वस्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट घेतली. त्यांना या संदर्भात निवेदन दिले. यात त्यांनी म्हंटले आहे की, सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट चे विश्वस्त सावेडी हडको परिसरात हिंदू मुस्लिम धार्मिक सलोखा ठेऊन कार्य करीत आहेत. ट्रस्ट ची जागा वेळोवेळी हिंदू बांधवाना लग्न कार्य तसेच इतर धार्मिक कार्यासाठी वापरण्यास ट्रस्ट देते. सर्व जाती धर्मीयांसाठी अन्नदान, वैद्यकीय मदत असे उपक्रम राबवते.
तरीदेखील ट्रस्ट विरोधात अर्ज निवेदने केली जातात. पोलिसात खोट्या तक्रारी दिल्या जातात. या भागातील हिंदू धर्मीयांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. ट्रस्ट च्या स्थापनेपासून आता पर्यंत पोलिसात परस्परविरोधी एकही तक्रार दाखल नाही. तरीदेखील स्थानिक राजकारण आणि देवस्थानच्या जागेवर व्यवसायिक इमारत नियमबाह्य पद्धतीने उभी करून त्यातून अब्जावधी रुपये कमवण्याचा घाट घालणाऱ्या साई मिडास च्या संचालकांनी हे कूट कारस्थान रचले आहे.
याचे संचालक हेमचंद्र इंगळे, प्रभाकर बोरकर, जयवंत भापकर, मयूर शेटीया, विजय मर्दा, हर्षल भंडारी हे नगरमधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हाताशी धरून खोटे नाते आरोप करून ट्रस्ट च्या विश्वस्तांना वेठीस धरत धरून ट्रस्ट ला बदनाम करीत आहेत. याविरोधात आपण साई मिडास वर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे ट्रस्टच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे. या संचालकडून आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याने आपले काही बरेवाईट झाल्यास त्याला यांनाच जबाबदार धरावे असे त्यांनी म्हंटले आहे.
आमच्या देवस्थानची टी पी स्कीम नंबर ४ फायनल प्लॉट नंबर ४४ ही जमीन आपण दूध संघाला मोबदला घेऊन दिली होती. त्यावर दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक उपक्रम उभा करा अशी अट होती. नंतर दूध संघाने या जागेवर आपला प्लॅन्ट उभा केला. काही वर्ष तो चालवला. नंतर संघात संचालकांनी भ्रष्ट कारभार केला. त्यामुळे संघ अवसायनात गेला. जागेचा लिलाव करून बँकेने आपली रक्कम वसूल केली. आणि ही अब्जावधी रुपयांची ही जागा साई मिडासला कवडीमोल भावात लिलावात मिळाली.
वास्तविक ही जागा वर्ग तीन ची इनामी जागा आहे. त्याचा वाद महसूल विभागाशी चालू आहे. या जागेवर सार्वजनिक अथवा निम सर्वजनिक असे पालिकेचे आरक्षण पडलेले आहे. असे असतांना तेथे व्यावसायिक आणि निवासी संकुल साई मिडास ने उभे केले. जे की बेकायदेशीर आहे. आणि खोटी परवानगी आणि ५ कोटी रुपयांचे बांधकाम परवानगी शुल्क भरल्याचे दाखवून बांधकाम पूर्णत्व दाखला घेण्यात आला. त्यात पालिकेची फसवणूक करण्यात आली. अधिकृत बांधकाम परवानगी घेताना साई मिडास ने अफरा तफरी केल्याचे पालिकेला निदर्शनास आले आहे.
आता ज्या मूळ उद्देशाने ही जागा ट्रस्ट ने दूध संघाला दिली होती. ती मोक्याची जागा ट्रस्ट परत मागत आहे. कारण या जागेवर सार्वजनिक प्रकल्प न होता खाजगी व्यावसायिक प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे व्यवहारातील अटी शर्तींचा भंग झाला आहे. म्हणून ट्रस्ट ने या जागेवर आपला मालकी हक्क सांगत दावा केला आहे. हे सर्व कायदेशीर आहे तरी त्याला धार्मिक मुलामा देऊन हिंदू मुस्लिम वाद, लँड जिहाद असे मुद्दे पुढे करून बदनामी केली जात आहे. हे प्रकार रोखावेत. ट्रस्टला आणि विश्वस्तांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.