अहमदनगर प्रतिनिधी – दिवंगत सदानंद तथा नंदाकाका बेलवलकर यांचे व्यक्तिमत्त्व जगनमित्र होते. त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. दिल्या मदतीचा किचिंतसा सुद्धा आवाज होऊ दिला नाही. कोणताही गाजावाजा न करता जन्मभर नंदाकाका बेलवलकर नगर मित्र मंडळ पुणे व बेलवलकर उद्योग समूह च्या माध्यमातून अनेकांचे देवदूत बनले.

अनामप्रेम संस्थेच्या संगोपन मदत योजनेला नंदाकाका यांच्या स्मरणार्थ भरीव सहयोग वैद्य आणि बेलवलकर परिवाराकडून मिळाला. यातून अनेक दुर्लक्षित एका जागी पडून असणाऱ्या दिव्यांग यांना अनामप्रेम ने बनविलेल्या पेन्शन स्कीम चा मोठा जगण्याचा आधार होईल, असे प्रतिपादन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी अनामप्रेम संस्थेत आज केले.
नंदादीप संगोपन मदत योजनेची सुरुवात आज अनामप्रेम मध्ये करण्यात आली.यावेळी डॉ.कुलकर्णी बोलत होते. यावेळी नंदाकाका बेलवलकर यांच्या कन्या शुभा वैद्य जावई अनिरुद्ध वैद्य ,नात शरयू वैद्य यावेळी उपस्थित होते. यावेळी अनामप्रेम संस्थेच्या कामाची व नंदादीप या अभिनव योजनेच्या निर्मितीची कहाणी अनामप्रेम चे अजित कुलकर्णी यांनी सांगितली.
अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून मागील १७ वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसनाचे विविध निवासी उपक्रम अहमदनगर, पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. मागील १ वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील दिव्यांग यांच्याकरिता अनामप्रेम संस्था विविध योजना राबवित आहे. सरकारी निकष पूर्ण न करू शकणारे व सरकार दरबारी अपंगत्वामुळे न पोहचू शकणाऱ्या दिव्यांग यांच्यापर्यंत अनामप्रेम संस्थेचे कार्यकर्ते पोहचले.
प्रौढ व असहाय्य दिव्यांग यांच्याकरिता नंदादीप पेन्शन स्कीम ची सुरुवात करण्यात आली. एप्रिल २०२२ पासून प्रत्येक महिन्याला अशा अत्यंत गरजू दिव्यांग यांना मासिक ५०० रुपये पेन्शन स्कीम अनामप्रेम कडून सुरु करण्यात आली आहे. या स्कीम च्या माध्यमातून सर्वेक्षण करून २५ दिव्यांग यांना प्रत्येकी ५०० रुपये मदत मनिऑर्डर द्वारे आज पाठविण्यात आली आहे.
यामध्ये नगर तालुक्यातील डोंगरगण,जेऊर,पिंपळगाव माळवी,धनगरवाडी, मेहकरी,भातोडी पारगाव,इमामपूर, आव्हाडवाडी या गावातील दिव्यांग यांचा समावेश आहे. अशा प्रकारची मदत मिळणार असल्याने दिव्यांग व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बहुविकलांग दिव्यांगांसाठी नंदादीप स्कीम जगण्याची एक आशा
पुणे येथील शरयू व शुभा अनिरुद्ध वैद्य यांच्या परिवाराकडून स्व.नंदाकाका बेलवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनामप्रेम ला पहिल्या वर्षाचा ४ लक्ष रुपयांचा सहयोग देण्यात आला. या सहयोगातून नंदादीप पेन्शन स्कीम आकाराला आली. अनामप्रेम मागील १ वर्षांपासून नगर जिल्ह्यात दिव्यांग यांचे सर्वेक्षण करीत असून प्रत्येक गावातील दिव्यांग यांच्यापर्यंत सहयोगाचा हात देण्याचा,अपंगांना सबळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
शासन स्तरावर संजय गांधी योजना ही एकमेव अपंगांना मासिक १ हजार रुपये पेन्शन देणारी योजना आहे. बरेच दिव्यांग या योजनेच्या निकषांची पूर्तता करू शकत नाही. यामुळे असे दिव्यांग अत्यंत वंचित राहत आहेत. सलून, सॅनिटरी पॅड, मूलभूत किराणा,औषधे, मोबाईल रिचार्ज,कपडे यांचा खर्च करू शकत नाही. अशा दिव्यांग यांना अनामप्रेम च्या वतीने छोटा मदतीचा आधार नंदादीप च्या माध्यमातून देण्याचा अनामप्रेम चा प्रयत्न आहे. पहिल्या वर्षी १०० दिव्यांग यांना नंदादीप पेन्शन स्कीमच्या माध्यमातून अनामप्रेम मदत देणार आहे.
बऱ्याच झोपून असणाऱ्या दिव्यांग यांच्या पालक यांना विशेषतः आईला दिव्यांग पाल्य सांभाळण्यासाठी संगोपन भत्ता मिळावा,आर्थिक दुर्बल कुटूंबात बहुविकलांग दिव्यांग यांचे जगण्याचे प्रश्न जटिल असतात. यामुळे नंदादीप सारखी स्कीम अशा दिव्यांग यांना जगण्याची आशा कायम ठेवणारी आहे.
आपल्या परिसरातील अशा अंथरुणाला खिळून असणाऱ्या दिव्यांग याना अनामप्रेम च्या नंदादीप स्कीम ची माहिती द्यावी. त्यासाठी उमेश पंडुरे- 9011670123 ,विष्णू वारकरी-7350517778, जे.आर.मंत्री- 9921509199, अभय रायकवाड-9226880992 यांना सम्पर्क साधावा. अनामप्रेम ,गांधी मैदान,स्नेहालय मागे,अहमदनगर येथे नंदादीप पेन्शन स्कीम ची माहिती उपलब्ध आहे.
अनामप्रेम च्या नंदादीप पेन्शन स्कीमला इच्छुक देणगीदार जरूर सहयोग देऊ शकता. अनामप्रेम संस्थेकडे नोंदणी असणारे 300 आर्थिक दुर्बल बहुविकलांग यांना नंदादीप चा आधार देण्याचा अनामप्रेम संस्थेचा संकल्प आहे.
या कार्यक्रमाचा समारोप बेलवलकर व वैद्य परिवाराला हृदय मानपत्र देऊन करण्यात आला. या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी अनामप्रेम चे अध्यक्ष अजित माने , भरत कुलकर्णी, डॉ.मेघना मराठे, उमेश पंडुरे, राहुल खिरोडे,माधवी सैदाणे, जे.आर.मंत्री, विष्णू वारकरी,अभय रायकवाड उपस्थित होते.