नगरचे आर्किटेक्ट स्व.अशोक काळे यांना राष्ट्रीय स्तरावरील मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
80

अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागात शेळी पालन उद्योग व्यवसायाला चालना देऊन, अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणारे आर्किटेक्ट स्व.अशोक काळे यांना इंडियन मिट सायन्स असोसिएशन एनआरसी मीटच्या (आयएमएसए) वतीने राष्ट्रीय स्तरावरील लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

काळे यांनी स्थापन केलेल्या अहमदनगर जिल्हा शेळीपालन व प्रक्रिया सहकारी संघाच्या कार्याचे विशेष कौतुक या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आले.

मिरट येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. स्व. अशोक काळे यांनी 1973 मध्ये मुंबईतील जे.जे. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये स्थापत्य शास्त्राची पदवी घेतल्यानंतर पुढील तीस वर्षे अहमदनगर येथे एक यशस्वी वास्तुविशारद म्हणून व्यावसाय केला.

1980 च्या दशकाच्या मध्यात त्यांनी ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी स्टॉल फेड शेळी पालन हा कायम उत्पन्नाचा एक फायदेशीर स्त्रोत असल्याचे ओळखून त्या दिशेने कार्य करण्यास सुरुवात केली.यासाठी त्यांनी मेक्सिको, इस्राईल, तुर्की, स्पेन या देशातील विविध बंदिस्त शेळीपालन प्रकल्पांना भेटी दिल्या आणि काळे मॉडेल (50 शेळ्या/ मेंढ्या व 2 बोकड) विकसित केला.

स्टॉल फेड शेळ्यांचे फार्म 2 हेक्टर कोरडवाहू जमिनीवर व्यवस्थापित केले जाऊ शकते. हा संकल्प समोर ठेऊन काळे आणि त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट मीनल काळे यांनी महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी जाऊन ही पद्धत शेतकर्‍यांना शिकवली.शेळीपालन विषयक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषद आणि चर्चा सत्रात त्यांनी हजेरी लावली होती.

विविध व्यासपीठावर व्यावसायिक शेळी पालन आणि मांस उत्पादन या विषयावर शोधनिबंध त्यांनी सादर केले.
स्व.काळे एनएमपीपीबी च्या सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य होते.भारत सरकारची केंद्रीय सल्लागार समिती असलेल्या मेंढी, शेळी आणि ससे (सीएसी) सल्लागार समिती, महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास संस्थेचे कार्यकारी सदस्य म्हणून राहिले.

त्यांनी 1993 मध्ये अहमदनगरमध्ये अहमदनगर जिल्हा शेळीपालन व प्रक्रिया सहकारी संघाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून मध्यपूर्व देशांमध्ये शेळीचे मांस निर्यात केले जात आहे.या प्रकल्पात ग्रामीण भागातील सुमारे सहाशे तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यात आला आहे.

त्यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक स्वयंचलित मटन प्रक्रिया कारखाना कार्यरत आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर राष्ट्रीय स्तरावरील लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here