कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाते उघडले,एक जागा बिनविरोध.तर दुसरीकडे महविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र तर शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये काल उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.भाजपच्या काही विद्यमान नगरसेविकांनी अचानक उमेदवारी अर्ज काढून घेतले.
कर्जत नगरपंचायत मध्ये प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लंकाबाई देविदास खरात या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका नीता आजिनाथ कचरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाते उघडले आहे.काल उमेदवारी अर्ज काढण्याचा शेवटचा दिवस होता.यावेळी प्रभाग दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लंका बाई देविदास खरात या बिनविरोध विजयी झाले आहेत. हा उमेदवार विजयी होण्यामध्ये या प्रभागाचे निरीक्षक दीपक शिंदे,याचप्रमाणे श्रीमंत शेळके व अजित फाळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विजयी उमेदवार लंकाबाई देविदास खरात यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला व लोकशाही मार्गाने आगामी सर्व जागांवर विजय मिळवू असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केला.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये काल सोमवारचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण होता.अनेक नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडणार असे अगोदरच लक्षात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही जागा बिनविरोध करण्याची तयारीत असल्याची माहिती सर्वांना मिळाली होती.
खबरदारीची उपाययोजना म्हणून भाजपने काही उमेदवार अज्ञात स्थळी नेले होते.आज सकाळी सर्वप्रथम भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका राखी शहा यांनी उमेदवारी मागे घेतली. यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडाली.त्यानंतर प्रभाग २ मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका निता कचरे या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये आल्या.त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा गोंधळ उडाला.
यावेळी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी देखील झाली.माजी मंत्री राम शिंदे हे देखील त्या ठिकाणी आले व त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.या गोंधळानंतर देखील उमेदवारी अर्ज काढण्यासाठी अनेक जण एकमेकांच्या मिनतवाऱ्या त्या ठिकाणी करत होते.
वेळ संपत आल्यावर देखील काही उमेदवारी अर्ज काढण्यासाठी प्रयत्न झाले.मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळ संपल्यामुळे आता कोणाचाही उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली त्यानंतर अनेक जण त्या ठिकाणाहून निघून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी
कर्जत नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडी एकत्र येणार का याविषयी उत्सुकता होती.आखे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली दोन जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आले असून. दहा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.ही आघाडी होणार की नाही याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.मात्र अखेर या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊन एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना मात्र महाविकास आघाडी मध्ये सहभागी झाला नाही.या पक्षाने मात्र सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्यामुळे अखेर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष या निवडणुकीतही स्वबळावर कर्जत नगरपंचायत मध्ये निवडणूक लढवणार आहे.
२७ उमेदवारांची माघार, १३ जागांसाठी ३२ उमेदवार
आज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण सत्तावीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे यामुळे अनेक प्रभागांमध्ये दुरंगी लढती होत आहेत. आज या प्रमुख उमेदवारांनी अर्ज मागे घेतले यामध्ये सचिन घुले,अशोक डोंगरे,अश्विनी शिरसागर,पूजा मेहेत्रे, कांचन खेत्रे, हर्षदा काळदाते,दादासाहेब सोनमाळी, अंकुश दळवी,सुनंदा पिसाळ,अनिल भैलुमे,प्रसाद ढोकरीकर यांचा समावेश आहे.आता एकूण १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.