अहमदनगर प्रतिनिधी – प्रभाग क्र.१५ व स्टेशनरोड परिसरातील गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या निषेधार्थ नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनपा कार्यालयावर परिसरातील महिलांनी मोर्चा काढून अति.आयुक्तांच्या दालनात ठिय्या देऊन निवेदन दिले.
याप्रसंगी दत्ता जाधव, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, मीनाथ मुथा, छाया जोशी, आशा धोंगडे, ज्योती कुकडे, शैला गोरे, स्मिता होरणे, मंदा खताळ, अनिल कुलथे, रेखा विधाते आदिंसह परिसरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका सुवर्णा जाधव म्हणाल्या, प्रभाग क्रमांक १५ मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून स्टेशनरोड भागातील आगरकर मळा, आनंदनगर, गजानन कॉलनी, स्मृती कॉलनी, एकता कॉलनी, विशाल कॉलनी, बेलेश्वर कॉलनी, एमएसईबी कॉलनी, अर्बन बँक कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, गवळीवडा, संभाजीनगर, मल्हार चौक, पराग पार्क, संजीवनी कॉलनी या सर्व भागात गेल्या सहा महिन्यापासून पिण्याचे पाणी कमी दाबाने व अपुर्या प्रमाणात येत असून, दर आठवड्याला पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.
याबाबत संबंधित अधिकार्यांना वारंवार तक्रार करुनही यावर उपाययोजना केल्या जात नाही. यासाठी आज महिलांसह मनपा आयुक्तांना या भागातील परिस्थितीची जाणिव करुन दिली आहे. ही परिस्थिती सुधारली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी अति.आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांशी चर्चा करुन प्रत्यक्ष पाहणी करुन हा पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.