नगर लोकसभा मतदारसंघात खासदार विखेंना कांदा रडवणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नगर लोकसभा मतदारसंघात खासदार विखेंना कांदा रडवणार

आ.लंके यांच्या मताधिक्यासाठी मतदारसंघातील विविध तालुक्यात स्पर्धा

प्रतिनिधी

केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवूनही कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या व राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.परिणामी नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांना कांदा रडवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांद्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा लाभ महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार नीलेश लंके यांना होणार असल्याचे मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असताना प्रकर्षाने पुढे आले आहे.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धरसोडीच्या धोरणामुळे गेल्या वर्षभरात कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नाही. त्यातच निर्यातबंदी लागू केल्याने खरीप हंगामातील लाल कांद्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. मतदानाला आठ दिवस बाकी असताना केंद्र सरकारने निर्यातशुल्कासह व किमान निर्यातमूल्याच्या अटींसह कांदा निर्यातीला परवानगी देऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. निर्यातशुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याचे दर स्पर्धक देशांच्या तुलनेत जास्त असल्याने भारतीय कांद्याला मागणी राहिली नाही.

परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले.त्यामुळे पारनेरसह नगर लोकसभा मतदारसंघातील नगर, श्रीगोंदे,कर्जत, जामखेड, राहुरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यातच आठ दिवसांपूर्वी रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली आहे.दुधालाही समाधानकारक भाव नाही.त्यामुळे ग्रामीण बहुल असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात, शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी असलेला असंतोष भाजपचे उमेदवार, खासदार डॉ.सुजय विखे यांना रडवणार की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कथित करिष्मा त्यांना तारणहार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

तत्कालीन कोपरगाव लोकसभा मतदारसंघ तसेच नगर लोकसभा मतदारसंघात, लोकसभा निवडणुकीच्या इतिहास आमदार नीलेश लंके यांनी विखे कुटुंबासमोर प्रथमच कडवे आव्हान उभे केले आहे . कोरोना संसर्गात आमदार लंके यांनी केलेल्या कामांमुळे मतदारसंघाबरोबरच संपूर्ण राज्यात त्यांच्याभोवती वलय निर्माण झाले आहे. त्यातूनच तरूणांमध्ये आमदार लंके यांची क्रेझ आहे. या जमेच्या बाजू असलेल्या आमदार लंके यांना शेतकरी, सर्वसामान्यांमध्ये असलेल्या भाजपविरोधी नाराजीचा लाभ होणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

दिवसेंदिवस चुरशीची होत गेलेल्या विखे व लंके यांच्या लढतीच्या निमित्ताने मतदारसंघाला पिढ्यानपिढ्या भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा होणे अपेक्षित होते.पारनेरच्या पठार भागाला कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळावे ही गेल्या तीस,चाळीस वर्षांपूर्वीपासूनची मागणी आहे.पारनेरच्या पठार भागाला कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळू शकते हे स्वप्न तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांनी पारनेरकरांना दाखवले.

‘पारनेरला भुईदंडाने पाणी मिळू शकते ‘ हे खासदार विखे यांचे आजोबा, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांचे आवडते गृहितक ! मात्र त्याबाबत ना बाळासाहेब विखे यांनी काही केले ना खासदार सुजय विखे यांनी काही केले.नगर तालुक्यातील गावांसाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना एक स्वप्नच राहिली आहे. या विषयांसह शेतीमालाला हमीभाव , बेरोजगारी, दुधाचा दर, नगर – पुणे थेट रेल्वे या प्रश्नांवर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा होणे अपेक्षित होते. आणि गेली पन्नास वर्षे आपल्या कुटुंबाचे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असल्याचा दावा करणाऱ्या, लोकसभेतील कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या खासदार विखे यांच्याकडून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची चर्चा होणे, त्यावरील उपाययोजनांची चर्चा होणे अपेक्षित होते.तसे चित्र मात्र प्रचारादरम्यान अभावाने दिसले.

मतदारसंघातील प्रश्न, विकास कामे याऐवजी खासदार विखे यांच्याकडून आमदार लंके यांच्या चारित्र्यहननावर भर देण्यात आला.त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला.सुपे औद्योगिक वसाहतीत आमदार लंके यांच्याकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांमार्फत आमदार लंके यांनी कोरोना संसर्गात केलेल्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केले. खासदार विखे यांनी केलेल्या आरोपांना आमदार लंके यांनी सडेतोड उत्तरे दिली.मात्र या गदारोळात मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न दुर्लक्षीत राहिले.

दरम्यान पारनेर येथील मेळाव्यात बोलताना, तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक गेल्या चाळीस वर्षापासून पाटाचे पाणी आणि विकास याबाबत केवळ आश्वासने ऐकत आहेत.गेल्या चाळीस वर्षात पारनेरचा विकास का झाला नाही असा सवाल खासदार विखे यांनी केला.विखे यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित अवाक झाले.गेली पन्नास वर्षे विखे कुटुंबिय या ना त्या मार्गाने पारनेर तालुक्याच्या सत्तेत आहे.असे असताना खासदार विखे यांनी विकासाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने तालुक्यात विखेंच्या दृष्टीने नकारात्मक चर्चेचा विषय ठरला.एकूणच मतदारसंघाच्या,पारनेर तालुक्याच्या विकासासाठी विविध उपाययोजनांची चर्चा करण्याऐवजी खासदार विखे यांनी विरोधी उमेदवार विरोधात तथ्यहीन आरोपांची राळ उठवण्यावर भर दिला असल्याचे चित्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे.त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • चौकट

कांद्याचे भाव गडगडण्याचा आणि सरकारचा काही संबंध नाही.कांद्याच्या भावातील चढ उतार ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सांगताना विखे यांनी एकप्रकारे कांदा निर्यातबंदीचे समर्थन केले.त्यामुळे मतदारसंघात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.त्यानी कांद्याच्या भावाबबत केलेल्या वक्तव्याची ध्वनीफित समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या वक्तव्यावरून विरोधकांनी विखे यांना चांगलेच घेरले आहे.त्यांच्यावर होत असलेल्या टिकेला तोंड देताना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ येत आहे.त्यामुळेही कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेत भर पडली असल्याचे चित्र आहे.

  • चौकट

नगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या विविध मतदारसंघांमध्ये आमदार लंके यांना मताधिक्य देण्याबाबत स्पर्धा लागली असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे.शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी सुपे येथील मेळाव्यात बोलताना नगर व पारनेर तालुक्यात मताधिक्याची स्पर्धा लावण्याचे आवाहन केले.या आवाहनाला दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

तेथूनच विविध तालुक्यात लंकेच्या मताधिक्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्यात आमदार लंके यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!