नागरदेवळे या छोट्याश्या गावातून जालिंदर बोरुडे या अवलियाने उभी केली नेत्रदान चळवळ
फिनिक्स फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना दिली नवदृष्टी
गरजूंसाठी फिनिक्स नेत्रालय उभारणीकडे वाटचाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रीय योगदान देणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना नवदृष्टी मिळवून दिली आहे. तर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकातील दृष्टीदोष असलेल्यांसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन त्यांचा दृष्टीदोष कमी करण्याचा सातत्याने कार्य सुरु आहे. या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानची समाजात जागृती सुरु आहे.
नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका छोट्याश्या गावातून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही नेत्रदान चळवळ उदयास आली. जलसंपदा विभागात कार्य करीत असताना जालिंदर बोरुडे या अवलियाने नेत्रदान चळवळीत उत्तुंग शिखरा एवढे कार्य उभे केले. तर गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे कार्य सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिन्याला पाच वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतले जात आहे. अद्याप सुमारे 3 लाख 33 हजार 369 रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून 913 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आले. अशाच प्रकारचे काम विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून केले जाते. परंतू जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीत केलेले कार्य वाखाणण्याजोगेच आहे. त्यांच्या कार्याला जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त दिलेला हा उजाळा….!
घरच खाऊन कशाला लष्कराच्या भाकरी भाजता…., असे अनेक टोमणे हे नेत्रदानाचे काम करतांना बोरुडेंना ऐकावे लागतात. परंतू समाधान मिळतं ना, मग बस! हेच नेहमीच ठरलेल उत्तर ते टोमणे देणाऱ्यांना देतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत, सामाजिक बांधिलकीतून 1991 मध्ये फिनिक्स फाऊंडेशनची स्थापना त्यांनी केली. सुरुवातीला असं काही ठरलेल नव्हत की, नेत्रदान चळवळीत कार्य करायचे मात्र, शहरातील विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब वंचितघटकांसाठी काहीतरी केले पाहिजे. यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली. गेल्या 32 वर्षांपासून नेत्रदान चळवळ, उपक्रम सुरु आहे.
जालिंदर बोरुडे हे जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झालेले असून, त्यांनी स्वत:ला या सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. समाजसेवेची आवड असल्याने व त्यांच्या नेत्रदान चळवळीमुळे ते हजारो रुग्णांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील नागरदेवळे, पारनेर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी व नगर शहरात आदि ठिकाणी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला नागरदेवळे येथे हे शिबीर होत असते. त्याचा फायदा अनेक गरजू रुग्ण घेत आहे. तसेच या चळवळीच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. या सामाजिक कामासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचे पाठबळ मिळत आहे.
बोरुडे यांच्या नेत्रदान चळवळीने आता गती घेतली असून, नेत्रदान चळवळीवर आधारीत त्यांनी समाजाला प्रेरक असे दृष्टीमित्र व नेत्रज्योत नावाची दोन पुस्तके लिहीली आहे. या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. फिनिक्सच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिराला राज्यभरातून सर्वसामान्य घटक सहभागी होऊन लाभ घेत आहे. बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याने सुरु असलेली नेत्रदान चळवळ अशीच पुढे सुरु राहो. त्यांच्या या कार्यात समाजातील प्रत्येकाने हातभार लावण्याची खरी गरज असून, नेत्रदान करण्यासाठी व करुन घेण्यासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडून अनेक दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळणार आहे.
फिनिक्स नेत्रालय उभारणीकडे वाटचाल
आर्थिक दुर्बल घटक व गरजू रुग्णांना मोफत नेत्र उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून फिनिक्स नेत्रालय उभारण्याचे कार्य सुरु आहे. तपोवन रोड येथे स्वत:च्या मालकीच्या जागेत हे हॉस्पिटल उभे केले जाणार आहे. त्याचे नियोजित डिजाईन व आराखडा तयार असून, लवकरच त्याला मंजूरी मिळणार आहे. त्या दृष्टीने कामकाज सुरु आहे. लोकवर्गणीतून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे. -जालिंदर बोरुडे (संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स सोशल फाऊंडेशन)