नागरदेवळे येथे बुधवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम
फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गरजूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) येथे बुधवारी (दि.10 एप्रिल) फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करुन गरजेनुसार मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा आदी संबंधित शस्त्रक्रिया होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत शिबिर होणार आहे. सदर शिबिरात सर्व रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन, ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांना पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलला पाठविण्यात येणार आहे. रुग्णांची पुणे येथे जाणे-येणे, राहणे व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या शिबिराची अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी जालिंदर बोरुडे 9881810333 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.